- धर्मराज हल्लाळे/दुर्गेश सोनार भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी उदगीर (जि. लातूर) : कोणतीही सत्ता डोळे नष्ट करू शकते. डोळ्यामागे दडलेली विचारदृष्टी नष्ट करू शकत नाही. ही दृष्टी देण्याचे काम साहित्य करते. त्यात वैचारिक मतभेद असू शकतील, पण मनभेद नको, असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे केले.
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी गडकरी म्हणाले, समाजात अनेक दोष आहेत. हे दूर करायचे असेल तर लोकांचे मन बदलावे लागेल. त्यात साहित्यिक, पत्रकार, कलावंतांची भूमिका महत्त्वाची आहे. साहित्यिकांनी कोणत्या विषयावर लिहावे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, लेखन उद्दिष्ट काय याचाही विचार व्हावा. साहित्य जर राष्ट्रानुकूल, युगानुकूल असेल तरच देश जगाला मार्गदर्शन करू शकेल.
‘समता व शौर्य ही महाराष्ट्राची ओळख’राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा संदेश चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला. राष्ट्रपतींनी संदेशाची सुरुवात मराठीतून केली. समता आणि शौर्य ही महाराष्ट्राची ओळख असल्याचे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महाराष्ट्रातील समृद्ध संत परंपरेचा दाखल देत त्यांनी संत तुकारामांचा अभंगही सादर केला.
राजकारणावर बोलू नये...शिक्षण, साहित्याच्या व्यासपीठावरून राजकारणावर बोलू नये. राजकारणी साहित्य जाणणारा असेल तर त्याचे प्रतिबिंब धोरणात उमटते, हे सांगताना गडकरी यांनी सुधाकरराव नाईक, श्रीकांत जिचकार यांचा उल्लेख केला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ८६२ गावांतील जनतेच्या कुचंबणेचा मुद्दा पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री बनसोडे यांनी मांडला. नितीन गडकरी भाषणाला उभे राहिले तेव्हा, सीमा प्रश्नावर घोषणाबाजी झाली.