राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन
लातूर : शहरातील रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहेत. तीन गटात ही स्पर्धा होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. वय वर्ष १० ते १५, मध्यम गटात १६ ते २१ आणि २१ वर्षावरील वरिष्ठ गटासाठी विषय देण्यात आले आहेत. सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अनुप देवणीकर, रवींद्र बनकर,डॉ. किरण दंडे, अनिकेत येरटे व डॉ. जंगमे यांनी केले आहे.
हिवताप दिनानिमित्त विविध उपक्रम
लातूर : जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविले जाणार आहेत. १० लाख ७९ हजार रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, १७ जणांना हिवताप झाल्याचे निदान झाले आहे. दरम्यान हिवतापाच्या रुग्णसंख्येत दरवर्षी घट होत असल्याचे चित्र आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे प्रयत्न असून, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
होम आयसोलेशनमधील रुग्णांनी नियमांचे पालन करावे
लातूर : सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना आरोग्य विभागाच्या वतीने होम आयसोलेशनचा पर्याय देण्यात येत आहे. मात्र, गृह विलगीकरणातील काही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आल्याने रुग्णांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आशा कार्यकर्ती, प्रशासनाच्या वतीने होम आयसोलेशनमधील रुग्णांवर वॉच ठेवण्यात येत असून, प्रत्यक्ष भेटी दिल्या जात आहे. रुग्णांसाठी स्वतंत्र नियमावली देण्यात आली असून, पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पाच नंबर चौकात वाहनांची तपासणी
लातूर : एमआयडीसी परिसरातील पाच नंबर चौकात मनपा आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहनांची तपासणी तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जात आहे. लातूर शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बार्शी रोडवरील पाच नंबर चौकात इतर शहरातून वाहने, प्रवासी येत असल्याने या चौकात तपासणी मोहीम राबविली जात असल्याचे मनपा आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर तपासणी
लातूर : जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण भागातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग तसेच पल्स ऑक्सिमीटरने तपासणी केली जात आहे. मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे पालन करण्याच्या सूचना करण्यात येत आहे. जि.प. मधील कार्यालयातही सॅनिटायझर, मास्कचा नियमित वापर केला जात आहे. नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे मोफत लसीकरण केंद्र
लातूर :शहरातील रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने मोफत लसीकरण केंद्र सुरू केले आहे. यावेळी डॉ. संजय शिवपुजे, रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे ओम मोतीपवळे, डॉ. पुरुषोत्तम दरक, श्रीकांत पंचाक्षरी, अध्यक्ष अनुप देवणीकर, सचिव रवींद्र बनकर, किशोर दातळ, गणेश सावंत आदींसह सदस्यांची उपस्थिती होती. रोटरी क्लबच्या वतीने आयोजित या मोफत लसीकरणाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्याने उकाड्याचा त्रास
लातूर : शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असल्याने दुपारच्या वेळी उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेक जणांनी कूलर, पंख्याला पसंती दिली असून, ग्रामीण भागातील नागरिक दुपारच्या वेळी शेतातील झाडांचा आधार घेत आहेत. दुपारच्या वेळी शेतशिवारासह रस्त्यावर कडक उन्हामुळे शुकशुकाट पहावयास मिळत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
दहावी ऑनलाईन वर्गाला प्रतिसाद
लातूर : शहरासह जिल्ह्यात दहावीच्या उन्हाळी वर्गाला सुरुवात झाली आहे. शाळांच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने वर्ग घेतले जात असून, विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नववी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत. शाळांच्या वतीने सकाळ आणि दुपारच्या सत्रात तासिका घेतल्या जात आहे. आगामी काळात या वर्गाला विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल असे मुख्याध्यापकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.