उदगीरच्या मालधक्क्यावरून नागालँडला निघाले साखरेचे पोते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:19 AM2021-04-22T04:19:31+5:302021-04-22T04:19:31+5:30
उदगीर : उदगीरातील रेल्वेच्या मालधक्क्याहून २१ बोगीतून १ हजार ३२३ टन साखर नागालँडमधील दिनापूरला पाठविण्यात आली आहे. त्याच्या भाड्यापोटी ...
उदगीर : उदगीरातील रेल्वेच्या मालधक्क्याहून २१ बोगीतून १ हजार ३२३ टन साखर नागालँडमधील दिनापूरला पाठविण्यात आली आहे. त्याच्या भाड्यापोटी रेल्वेला ३६ लाख ९१ हजार ६७७ रुपये मिळाले आहेत. उदगीरातील मालधक्क्यामुळे रेल्वेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे.
उदगीर येथे यापूर्वी मालधक्का होता. कालांतराने तो नामशेष झाला होता. उदगीरातील मालधक्का पूर्ववत होण्यासाठी उदगीर रेल्वे संघर्ष समितीने सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे यंदा मालवाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली. त्याचा लाभ उठवत उदगीरातील व्यापाऱ्यांनी सोयाबीनची वाहतूक करीत पहिल्या टप्प्यात ३८ लाखांचे भाडे देणारे बुकिंग पूर्ण केले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही ३८ लाखांचे भाडे देणाऱ्या सोयाबीनची वाहतूक करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात भालकेश्वर साखर कारखान्याने साखर वाहतूक केल्याने १० लाखांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले. आता हा चौथा टप्पा ३६ लाख ९१ हजार ६७७ रुपयांचे भाडे मिळवून देणारा आहे.
नागालँडमधील दिनापूर येथे विकास साखर कारखान्याची साखर पाठविण्यात आली. २६ हजार ३७६ बॅगमधून १ हजार ३२३ टन साखर २१ बोगींतून पाठविण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण १ कोटी २३ लाखांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे.
यावेळी वाणिज्य निरीक्षक संतोष चिगळे, स्टेशन अधीक्षक दीपक जोशी, गोपाल यादव, संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे उपस्थित होते. विकास कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक ए. के. पवार यांनी या निर्यातीसाठी पुढाकार घेतला होता.
सोयी-सुविधांसाठी होणार लाभ
उदगीर रेल्वेस्थानकाच्या नफ्यात मोठी भर पडली असून, भविष्यात सोयी-सुविधा व अनेक मंजुरीसाठी त्याचा लाभ होणार आहे. उदगीर व परिसरातील व्यापारी आणि कारखान्यांनी स्वस्त व सुरक्षित असणाऱ्या रेल्वे वाहतुकीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उदगीर रेल्वे संघर्ष समिती सचिव मोतीलाल डोईजोडे व स्टेशन अधीक्षक दीपक जोशी यांनी केले आहे.
दरम्यान, उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे व स्टेशन अधीक्षक दीपक जोशी यांनी विविध व्यापारी व कारखान्यांना भेटी देऊन या वाहतुकीचे महत्त्व व फायद्याची जाणीव करून दिल्यानंतर आता नोंदणी वाढत आहे. उदगीर व परिसरातील व्यापारी आणि कारखान्यांनी स्वस्त व सुरक्षित वाहतूक असणाऱ्या रेल्वेचा लाभ घेतल्यामुळे उदगीर रेल्वेस्थानकाचा वेगाने विकास होईल, अशी अपेक्षा आहे.