दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षाच, पेरणीसाठी बळीराजाचे नभाकडे डोळे!
By हरी मोकाशे | Published: June 29, 2023 06:10 PM2023-06-29T18:10:03+5:302023-06-29T18:10:55+5:30
बहुतांश भागात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, पेरणीस प्रारंभ झाला नाही.
लातूर : आर्द्रा नक्षत्रात कधी रिमझिम तर कधी मध्यम पाऊस होत असल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश भागात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ६०.३ मिमी पाऊस झाला आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र उन्हाचे चटके बसले. त्यामुळे सर्वांचे पावसाळ्याकडे लक्ष लागून होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व शेती मशागतीची कामे आटोपून बी- बियाणे, खताची जुळवाजुळव सुरु केली होती. मृग निघाल्यानंतर पाऊस होईल आणि उष्णतेपासून बचाव होण्याबरोबरच वेळेवर पेरणी होईल, अशी आशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होती. परंतु, मृग कोरडा गेला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.
गत आठवड्यात आर्द्रा नक्षत्रास सुरुवात झाली आणि वातावरणातही बदल झाला. ढगाळ वातावरण निर्माण होऊन कधी रिमझिम तर कधी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे बळीराजास दिलासा मिळाला. लवकरच मोठा पाऊस होईल आणि चाढ्यावर मुठ धरता येईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली. मात्र, बहुतांश भागात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, पेरणीस प्रारंभ झाला नाही.
देवणीतील तिन्ही मंडळात दमदार...
देवणी तालुक्यात आतापर्यंत सरासरी ९२.९ मिमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील देवणी मंडळात ९०.३, बोरोळमध्ये १००.६, वलांडीत ८७.६ मिमी पाऊस झाला आहे. तांदुळजा मंडळात ७६.८, लामजना- ७५.२, अहमदपूर- ७४.९, किनगाव- ८०.४, शिरुर ताजबंद- ९८.४, कासार बालकुंदा- ७७.७, कासारशिरसी- ८३.८, हलगरा- ७७.३, उदगीर- १०१.६, नागलगाव- ११२.५, मोघा- १६४.५, हेर- ७९.७, तोंडार- ९६.७, चाकूर- ९३.२, झरी- ८६.३, पानगाव- ८४.६, पळशी- १०१.४, साकोळ- ७७, हिसामाबाद मंडळात ८२.४ मिमी पाऊस झाला आहे.
पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करु नये...
जिल्ह्यातील अनेक भागात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. सलग दोन - तीन दिवस दमदार पाऊस होऊन शेतात ५ ते ६ इंच ओल झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी करावी. अन्यथा उगवण होण्यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई करु नये.
- रक्षा शिंदे, प्रभारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
बियाणे, खतांची खरेदी करा...
पेरणीसाठी पुरेशी ओल झाल्याशिवाय पेरणी करु नये. तसेच पाऊस झाल्यानंतर शेतकरी बी- बियाणे, खते खरेदीसाठी बाजारात येतात. त्यामुळे बाजारपेठेत एकच गर्दी होते. शेतकऱ्यांनी आताच बियाणे, खतांची खरेदी करावी. त्यामुळे ऐनवेळी धावपळ होणार नाही.
- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी.
देवणी तालुक्यात सरासरी ९२ मिमी पाऊस...
लातूर ४७.७
औसा ३१.४
अहमदपूर ६९.३
निलंगा ५६.८
उदगीर ८७.४
चाकूर ६२.६
रेणापूर ६६.४
देवणी ९२.९
शिरुर अनं. ७१.९
जळकोट ३६.७