अहमदपूर (लातूर ) : शहरातील पाणी टंचाई भीषण होत चालली असून नगरपरिषदेच्या वतीने ३५ दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने स्वामी विवेकानंद मित्र मंडळाच्या वतीने सोमवारी नगरपरिषदेसमोर अनोखे स्नान करो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मटकी फोडून आपला रोष व्यक्त केला. दरम्यान, प्रशासनाने १० दिवसात टँकरची व्यवस्था करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अहमदपूर शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या लिंबोटी धरणात मुबलक पाणी पुरवठा असूनही केवळ नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी व कार्यक्षमतेमुळे ३५ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. दरम्यान, स्वामी विवेकानंद मित्र मंडळाच्या वतीने १० मे रोजी नगरपरिषदेला पाणी सुरळीत करण्यासंदर्भात पत्र दिले होते. मात्र नगरपरिषदेने कुठलीही कार्यवाही केली नाही. याच्या निषेधार्थ सोमवारी नगरपरिषदेवर शहरातून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा क्षिप्र गणेश मंदिर, आझाद चौक, पोस्ट आॅफिसवरून थेट नगरपरिषदेसमोर आला. त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून अनोखे स्नान करो आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या कार्यालयासमोर मटकी फोडून आंदोलन करण्यात आले.
यावेळी स्वामी विवेकानंद मित्र मंडळाचे स्वप्नील व्हते, संदीप चौधरी, मधुकर धडे, राम आलगुले, सुशांत गुणाले, नीलेश हिवरे, श्याम यादव, सिद्धेश्वर जगताप, अमोल सजनशेट्टी, बालू तेलंगे, किशोर कोरे, अभिजीत पुणे, प्रेम हामने, सुनील देशमुख, गंगाधर हेगणे, अतुल गिरी, अजय गादगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
१० दिवसात टँकरने पाणी पुरवठा...शहरात भीषण पाणी टंचाई असल्याने जिल्हाधिकाऱ्याांकडे २७ विंधन विहीर व २५ टँकरच्या मागणीचा प्रस्ताव नगरपरिषदेने पाठविला असून याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यानंतर लगेच पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन नगर परिषदेच्या वतीने पाणी पुरवठा अभियंता गिरी यांनी दिले. यावेळी नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे, राहुल शिवपुजे, बालाजी आगलावे आदी उपस्थित होते.
काँग्रेसच्या वतीने निवेदन...शहरातील पाणी टंचाईसाठी उपाययोजना करण्यासंदर्भात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनावर विकास महाजन, चंद्रकांत मद्वे, देवानंद मुळे, प्रकाश ससाणे, अनिल बोडगे, अनिल कांबळे, रामबापू नरवटे, सोपान शिवणे, शिवकुमार उटगे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.