डॉक्टर्स, नर्सेसला प्रशिक्षण
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफला प्रशिक्षण देण्यात येत आहे. जुलैअखेरपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
शासकीय व खासगी स्तरावर तयार करण्यात येत असलेल्या सुविधांची पाहणी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन करावी. सुविधांची आणखी गरज असेल तर त्या वाढविण्याबाबत सुचित करावे.
१० हजार बेड्सची उपलब्धता
शासकीय व खासगी मिळून १० हजार बेड उपलब्ध केले जाणार आहेत. बालकांसाठी किमान दोनशे ऑक्सिजन बेड उपलब्ध ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. शासकीय व खासगी एकूण ५४० ऑक्सिजन बेड निर्माण करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात दहा याप्रमाणे शंभर उपजिल्हा रुग्णालयात १५, स्त्री रुग्णालयात २०, सामान्य रुग्णालय उदगीर येथे २५, खासगी बाल रुग्णालयात २५० बेड निर्माण करण्याचे नियोजन आहे.
लहान मुलांसाठी केअर सेंटर
बालकांसाठी दोनशे ऑक्सिजन बेड उपलब्ध ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये त्यासाठी दोन स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकूण १०५ आयसीयू बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.
कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ऑक्सिजन साठवण क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांनीही त्यांच्याकडील ऑक्सिजन साठवण क्षमतेत वाढ करण्याची गरज आहे. जम्बो व डुरो सिलिंडरची संख्या वाढवावी. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जिल्हा कार्यालयाने यामध्ये लक्ष घालून खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन साठवण क्षमता वाढविण्याबाबत सुचित करण्याचे निर्देश जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत देण्यात आले. - पृथ्वीराज बी.पी., जिल्हाधिकारी.