शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत भावंडांची घरे जळाली; दहा लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 07:09 PM2019-05-10T19:09:06+5:302019-05-10T19:10:40+5:30
पहाटेच्या सुमारास विद्युत प्रवाह कमी- जास्त होऊन शॉर्टसर्किट झाले़
किनगाव (जि़ लातूर) : अहमदपूर तालुक्यातील चिखली येथे शॉर्टसर्किटने आग लागून दोन घरे जळाली़ यात दहा लाखांचे नुकसान झाले़ ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली़
चिखली (ता़ अहमदपूर) येथील रामकृष्ण गोविंद चाटे व विकास गोविंद चाटे हे दोन सख्खे भाऊ असून त्यांचे घर एकमेकांच्या जवळ आहे़ दोघांची घरे माळवदाची आहेत. उकाड्यामुळे सर्वजण छतावर झोपले होते़ दरम्यान, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विद्युत प्रवाह कमी- जास्त होऊन शॉर्टसर्किट झाले़ त्यामुळे घराला आग लागली़ रामकृष्ण चाटे यांचे एक लाख २० हजारांचे तर विकास चाटे यांचे आठ लाख ३८ हजारांचे नुकसान झाले़ फ्रिज, पंखा, टीव्ही, कपडे असे संसारपयोगी साहित्य, अन्नधान्य, शेती उपयोगी साहित्य आणि दीड लाखांचे दागिणे व रोख ५० हजार रुपये जळाले़ आगीत एकूण ९ लाख ५८ हजारांचे नुकसान झाले.
घराला आग लागल्याचे पाहून शेजारील लोकांनी आरडाओरडा करून त्यांना जागी केले़ पोलीस पाटील संग्राम बरूरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहमदपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी आश्विनी पाटील यांना तात्काळ माहिती दिली़ अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले़ अग्निशमन दल पोहोचेपर्यंत घर भस्मसात झाले होते. या घटनेचा पंचनामा मंडळ अधिकारी डी.एस. कराळे, तलाठी मुंडे यांनी केला आहे. घटनास्थळास महावितरणचे सहाय्यक अभियंता एन.जे. गिरी यांनी भेट देऊन पाहणी केली.