लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांच्या कोऱ्या उत्तरपत्रिका सांभाळण्याचा भार आता शाळांवर पडला आहे. परिणामी, याचा मुख्याध्यापकांवर ताण वाढला आहे.
दहावी बोर्ड परीक्षा २३ एप्रिल, तर बारावीच्या परीक्षा २९ एप्रिलपासून जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याने दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा नेमक्या कधी होतील, याविषयी अद्याप तरी अधिकृत माहिती सांगता येणार नाही. असे असले तरी मेअखेर किंवा जून महिन्यात या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यातच परीक्षा जाहीर केल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्र संचालकांना परीक्षेचे साहित्य वाटप केले होते. त्यानंतर निर्णय बदलला.
परीक्षा कधी? पुढील परीक्षा कधी?
गतवर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर कोरोनाचे संकट अधिक गतिमान झाले. मात्र, त्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीसाठी अडचणी निर्माण झाल्या.
यंदा परीक्षा वेळेवर घेण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले होते. मात्र, ऐन परीक्षेच्या तोंडावर कोरोना बाधितांचा आलेख वाढला. यातूनच परीक्षा लांबणीवर टाकाव्या लागल्या.
सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करून संबंधित विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.
परिणामी, महाराष्ट्रात शिक्षण मंडळाच्या वतीने काय निर्णय होणार, याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.
हे साहित्य ठेवावे लागणार कस्टडीत
परीक्षेसाठी वाटप केलेल्या साहित्यात कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्राॅफ्ट, स्टिकर, सिटिंग प्लँट, एबी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक पेपरचे साहित्य, ओएमआर, गुणपत्रिका आदींचा समावेश आहे.
परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या निर्णयानंतर प्राप्त झालेले साहित्य सांभाळण्याची वेळ मुख्याध्यापकांवर आली आहे. पेपरचे नुकसान होणार नाही, यासाठी मुख्याध्यापकांना काळजी घ्यावी लागेल.