अहमदपुरातील १०२ गावांपर्यंत पोहोचला कोरोनाचा संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:20 AM2021-04-23T04:20:56+5:302021-04-23T04:20:56+5:30

अहमदपूर : शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. आतापर्यंत ५ हजार ५२२ कोरोना बाधितांची नोंद झाली असून सध्या १ ...

Corona infection reaches 102 villages in Ahmedpur | अहमदपुरातील १०२ गावांपर्यंत पोहोचला कोरोनाचा संसर्ग

अहमदपुरातील १०२ गावांपर्यंत पोहोचला कोरोनाचा संसर्ग

Next

अहमदपूर : शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. आतापर्यंत ५ हजार ५२२ कोरोना बाधितांची नोंद झाली असून सध्या १ हजार ५३६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, तालुक्यात एकूण १२३ गावे असून त्यापैकी १०२ गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे.

अहमदपूर शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण भागात कोरोना चाचणी करण्यात येत असली तरी काहीजण लक्षणे असतानाही भीतीपोटी चाचणी करून घेण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे कोरोना सुसाट वेगाने पसरत आहे. आरोग्य विभागाकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात येत असला तरी गृहविलगीकरणातील व्यक्ती घराबाहेर पडत असल्याने संसर्ग वाढला आहे. तसेच शासन नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव पातळीवर सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा स्वयंसेविकांवर जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु, आरोग्य कर्मचारी वगळता अन्य कर्मचारी, नागरिकांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

तलाठी, ग्रामसेवकांना सूचना...

ज्या गावात २५ पेक्षा जास्त बाधित रुग्ण असतील. तिथे गावातील शाळेत विलगीकरण सुरू करण्याच्या तलाठी, ग्रामसेवकांना सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी मास्क वापरावा. विनाकारण घराबाहेर पडू नये. आजार अंगावर काढू नये. हडोळती, शिरूर ताजबंद, किनगाव, थोडगावाडी, अंधोरी या गावांना भेटी देऊन विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात आली आहे.

- प्रसाद कुलकर्णी, तहसीलदार.

नियम तोडणाऱ्यांना दंड...

हडोळती येथे कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विनाकारण फिरणारे तसेच मास्कचा वापर न करणाऱ्यांना दंड आकारण्यात येत आहे. जे दुकानदार नियमांचे पालन करीत नाहीत, त्यांनाही दंड आकारण्यात येत आहे. ग्रामपंचायत, आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन यांच्या संयुक्तपणे गावात जनजागृती करुन कोविड चाचणी केली जात आहे.

- एस.जी. गिरी, ग्रामसेवक.

१४५९ जण गृहविलगीकरणात...

अहमदपूर तालुक्यात ५ हजार ५२२ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. सध्या १ हजार ५३६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ३ हजार ९१६ उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. ७० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. होमआयसोलेशन १४५९, कोविड केअर सेंटरमध्ये ४४, लातुरात ३३ रुग्ण उपचार घेत आहेत.

तालुक्यात सर्वाधिक १०२ रुग्ण थोडगावाडीत आढळले आहेत. हडोळती-१९६, शिरूर ताजबंद- १८३, किनगाव- १०६, अंधोरी-९६.

Web Title: Corona infection reaches 102 villages in Ahmedpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.