corona virus : जनता कर्फ्यूला लातूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 08:48 PM2021-02-27T20:48:47+5:302021-02-27T20:52:17+5:30
corona virus कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दोन दिवसीय जनता कर्फ्यू करण्याचे आवाहन केले होते.
लातूर : राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. शनिवारी पहिल्या दिवशी शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य व्यापारी प्रतिष्ठाणे बंद होती.
कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दोन दिवसीय जनता कर्फ्यू करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत दुकाने उघडली नाहीत. केवळ हॉस्पिटल, मेडिकल आणि काही ठिकाणची किराणा दुकाने सुरु होती.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला गंजगोलाई परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाण्याची टाकी परिसर, ५ नंबर चौक, सुभाष चौक, औसा रोड, अंबाजाेगाई रोड यासह अन्य चौक व रस्ते निर्मनुष्य दिसून येत होते. तसेच जिल्ह्यातील चाकूर, रेणापूर, औसा, निलंगा, औराद शहाजानी, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर, देवणी, वलांडी येथेही नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळला. त्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई...
शहरातील चौका- चौकात पोलीस, महानगर पालिका, नगरपालिका कर्मचा-यांकडून जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत होते. दरम्यान, रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. विशेष म्हणजे, पोलिसांकडून दंड आकारण्यावर भर दिला जात होता. तसेच मध्यवर्ती बसस्थानकातही तुरळक प्रवाशी दिसून येत होते. त्यामुळे बसेसची संख्या कमी करण्यात आली होती.