शिरूर अनंतपाळ : तालुक्यात १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील साडेबारा हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. कोवळी पिके दुपार धरू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुंडणीमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहील म्हणून शेतकऱ्यांनी दुंडणीस सुरुवात केली आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात २८ हजार ३८४ हेक्टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे. मृगाच्या प्रारंभी पावसाने जोरदार हजेरी लावली. जूनमध्ये दोनदा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृगातील पेरणी निरोगी असते, म्हणून पेरणीस प्रारंभ केला. बैलबारदाणा नसलेल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली. २८ हजार ३८४ हेक्टरपैकी २० हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.
पहिल्या टप्प्यात १२ हजार ६०२ हेक्टरवर तर दुसऱ्या टप्प्यात ७ हजार ४०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. पहिल्या टप्प्यातील उगवलेली पिके दुपार धरू लागली आहेत. त्यामुळे साडेबारा हजार हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
दिवसा ढग, रात्री चांदणे...
जूनमध्ये दोनदा पाऊस झाला; परंतु पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या वेळी टिपूर चांदणे पडत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील पिके कोमेजू लागली आहेत.
आतापर्यंत ९४ मिमी पाऊस...
शिरूर अनंतपाळ तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ७५० मिमी आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास महिना उलटला, तरीही केवळ ९४ मिमी एवढा पाऊस झाला आहे.