तलावाच्या पाळूवर उगवलेल्या वृक्षामुळे तलावांना धोका ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:15 AM2020-12-09T04:15:22+5:302020-12-09T04:15:22+5:30
वाढवणा बु. : उदगीर तालुक्यात यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने जवळपास सर्वच जलसाठे कमी-अधिक प्रमाणात भरले आहेत. उदगीर तालुक्यात ...
वाढवणा बु. : उदगीर तालुक्यात यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने जवळपास सर्वच जलसाठे कमी-अधिक प्रमाणात भरले आहेत. उदगीर तालुक्यात लघु, मध्यम, साठवण आणि पाझर तलावांची माेठी संख्या आहे. मात्र या प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. अनेक तलाव, प्रकल्पाच्या पाळूवर मोठी-मोठी झाडे वाढली आहेत. परिणामी, तलावांना धोका निर्माण झाला आहे.
उदगीर तालुक्यातील बहुतांश साठवण आणि पाझर तलावातील पाणी वाहून जाऊ नये, म्हणून मजबूत पाळूंची भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे तलावात पाणीसाठा जमा होते. मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा साठवण्यासाठी दरवाजे असतात मात्र साठवण आणि पाझर तलावांची पूर्ण भिस्त बांधलेल्या पाळूवर असते. याच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी पाटबंधारे विभागाची असते. तलावाच्या निर्मितीसाठी शासनाकडून लाखोंचा निधी खर्च केला जाताे. मात्र, दुरुस्ती आणि देखभालीसाठी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. उदगीर तालुक्यातील अनेक तलावाच्या निर्मितीला १० ते १५ वर्षांचा कालावधी झाला असून,पाळूवर उगवलेली झाडे आता मोठी झाली आहेत. यातून पाळूला भेगा पडणे, पावसाळ्याच्या दिवसात तलाव फुटण्यांची भीती व्यक्त केली जात आहे.
पाच वर्षापासून झाडे पाळूवरच...
वाढवणा ते केसगीरवाडी या रस्त्यावर ही तलावाची पाळू असल्याने यावर नेहमी वर्दळ असते. मागील पाच वर्षापासून संबंधित तळ्याच्या पाळूवरील झाडे काढण्यात आलेली नाहीत.
वाढवणा परिसरातील केसगीरवाडी,एकुर्का रोड,डावुळ, गुडसुर हे तलाव यंदाच्या पावसाळ्यात तुडुंब भरले आहेत, त्यामुळे सदरील तलावाच्या पाळूवर लहान मोठी झाडे खुप वाढली असल्याने तलावाला धोका निर्माण झाला आहे.
झाडामुळे वन्यप्राण्याचा वावर वाढला...
केसगीरवाडी येथील तलावाच्या पाळूवर मोठी मोठी झाडे वाढल्याने वन्यप्राणी यांचा वावर वाढला असून, शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये साप,सारसुळ, रानडुक्कर ,या जनावरांचा शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.
फोटो ओळी / उदगीर तालुक्यातील केसगीरवाडी साठवण तलाव यंदा तुडुंब भरला असून, पाळूवर झाडे उगवल्याने तलावाला धोका निर्माण झाला. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.