लातूर-तिरूपतीसह विविध रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:14 AM2021-07-02T04:14:32+5:302021-07-02T04:14:32+5:30
लातूर: लातूर-तिरूपती, लातूर-पुणे इंटरसिटी, लातूर-कोटा आदी रेल्वे गाड्या सुरू करण्यात याव्यात अशी मागणी रेल्वे सल्लागार मंडळाच्या बैठकीत बुधवारी करण्यात ...
लातूर: लातूर-तिरूपती, लातूर-पुणे इंटरसिटी, लातूर-कोटा आदी रेल्वे गाड्या सुरू करण्यात याव्यात अशी मागणी रेल्वे सल्लागार मंडळाच्या बैठकीत बुधवारी करण्यात आली.सल्लागार मंडळाच्या बुधवारी वेबिनार च्या माध्यमातून झालेल्या बैठकीत प्रस्तुत मार्गावरून गाड्या सोडण्याची मागणी करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेबिनारच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीला सोलापूर रेल्वेचे रामदास भिसे, श्रीमती सुधा,शुभम थोरात, लातूरचे स्टेशनमास्तर तिवारी, आर. बी. गायकवाड, शेखर गोखले, रेल्वे सल्लागार मंडळाचे सदस्य केयुर कामदार, अशोक गोविंदपूरकर नंदकिशोर अग्रवाल,सचिन मुंडे, विक्रम पाटील, विलास पवार आदींची उपस्थिती होती.
लातूर -तिरूपती, लातूर -पुणे इंटरसिटी फास्ट, लातूर- कोटा या नवीन रेल्वे गाड्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात अशी मागणी या बैठकीत लावून धरण्यात आली. लातूर शहर हे शैक्षणिक शहर म्हणून ओळखले जाते तसेच राजस्थानमधील कोटा शहरही शैक्षणिक शहर म्हणून ओळखले जाते.या दोन शहरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे ही दोन शहरे रेल्वेने जोडल्यास विद्यार्थी व पालकांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे हा मार्ग तात्काळ सुरु करावा अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.
लातूर स्थानकात लिफ्टची सोय करावी...
रेल्वे स्थानकात लिफ्टची सोय करण्यात यावी. तसेच जुन्या रेल्वे स्थानक परिसरात तिकीट बुकिंग काऊंटर आहे, त्याचे अत्याधुनिकीकरण करण्यात यावे. त्या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी बेंच, पाण्याची सोय करण्यात यावी,अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. हरंगुळ येथील रेल्वे स्थानकातील वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिल्यास रेल्वेचा महसुलातही वाढ होईल आणि व्यापाऱ्यांची सोय होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
मनपाच्या वतीने स्थानकात सुविधा देऊ...
नागपूर - कोल्हापूर, पुणे,-हैदराबाद, अमरावती- पुणे या गाड्या दररोज सोडण्यात याव्यात अशी मागणी नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांनी या बैठकीत लावून धरली. लातूर रेल्वे स्थानकावर रेल्वेने जागा उपलब्ध करून दिल्यास मनपाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असेही त्यांनी या बैठकीत सांगितले.