लातूर : जीडीएस समितीने शिफारस केल्याप्रकरणी सर्व वरीष्ठ ग्रामीण डाक सेवकांना अतिरिक्त वेतनवाढ देण्यात यावी, अव्यवहारिक उद्दीष्ट न देता मानसिक छळ थांबविण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियनच्या वतीने गांधी चौक येथील मुख्य पोस्ट ऑफीस कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
ग्रामीण डाक सेवकांना एका दिवसात २०० खाते उघडणे, लक्षपुर्तीची कामे जबरदस्तीने करावयास लावणे, उद्दीष्टपुर्ती न झाल्यास मानसिक त्रास देणे, नियमाविरुद्ध बदली करणे, विविध भत्त्यांचे पेमेंट न देणे, अतिरक्त कामाचा मोबदला देण्यास टाळाटाळ करणे अशा अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. त्यानुसार जीडीएस समितीने शिफारस केल्याप्रमाणे वरीष्ठ जीडीएस यांना अतिरक्त वेतनवाढ द्यावी, उद्दीष्टपुर्तीची सक्ती थांबविण्यात यावी, जीडीएस कर्मचाऱ्यांच्या रजेच्या काळात बदली कर्मचाऱ्यांना हजर राहण्याची परवानगी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी गुरुवारी पोस्ट कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात युनियनचे अध्यक्ष डी.एम. शिंदे, एम.डब्ल. शेख, पी.एम. सुर्यवंशी, व्ही.पी. बिराजदार, बी.एस. गाडे, आर.के. पटणे, एस.एच. सगर, बी.बी. लोकरे, डी.एस. टकटवळे, डी.बी. पटाडे, एम.बी. सय्यद, के.एस. शेख, एस.जी. कांबळे, ए.बी. महाके, सी.डब्लु. येळीकर, एस.डी. कदम आदींसह ग्रामीण डाक सेवक सहभागी झाले होते.
१६ मार्चपासून दोनदिवसीय संप...व्यावसायिक उद्दीष्टाच्या सक्तीविरोधात ग्रामीण डाक सेवकांच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी असहयोग आंदोलन करण्यात आले होते. तर गुरुवारी एकदिवसीय धरणे आंदोलन झाले. दरम्यान, आता १६ आणि १४ मार्च असे दोन दिवस देशव्यापी संप पुकारण्यात येणार असल्याचे ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियनच्या वतीने सांगण्यात आले.