रेल्वेप्रवास नको रे बाबा; तिकिट रद्द होण्याची संख्या वाढली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:19 AM2021-04-22T04:19:47+5:302021-04-22T04:19:47+5:30
लातूर : कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ...
लातूर : कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. दर दिवस तिकीट रद्द करण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र त्या तुलनेत मुंबई, पुण्याहून गावाकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे.
लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मुंबई, पुणे, हैदराबाद या प्रमुख शहरांत रोजगारानिमित्त स्थलांतर झालेल्या नागरिकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला प्रारंभ झाला. त्यानंतर लाॅकडाऊन जाहीर झाले. दरम्यान, ग्रामीण भागातील हजारो कामगार, चाकरमाने गावाकडे दाखल झाले. काहींनी रेल्वेचा आधार घेतला, तर काहिंनी बस आणि खाजगी वाहनांचा आधार घेऊन गाव गाठले. मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आणि पुन्हा शहरी रोजगार सुरू झाला. कारखान्यातील यंत्रांचे आवाज सुरू झाले. गावाकडचा मजूर, नागरिक पुन्हा रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरीत झाले. आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शासनाने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. परिणामी, अनेकांचा रोजगार ठप्प झाला आहे. मुंबई, पुण्यावरून लातूरला येणाऱ्या प्रवाशांची संख्या सध्या वाढली आहे.
मुंबई, पुणे रेल्वेची प्रवासी गर्दी ओसरली
लातूर जिल्ह्यातील नागरिकांची मुंबई, पुणे जाणाऱ्या रेल्वेची गर्दी सध्या ओसरली आहे. काहींनी प्रवासी तिकिटाचे आरक्षण करून ठेवले होते. ते सध्याच्या परिस्थितीत रद्द केले जात आहेत. सध्या मुंबई, पुणे येथील परिस्थिती गंभीर आहे. सध्या हा प्रवास अनेक जण टाळत आहेत. मात्र मुंबई, पुण्यात वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी गावाकडे येण्याचे नियोजन केले आहे. सकाळच्या रेल्वेला प्रवाशांची गर्दी आहे.
वाढत्या रुग्णसंख्येचा रेल्वे प्रवासावर परिणाम
दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती सध्या गंभीर होत चालली आहे. शासन, प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. परिणामी, रेल्वे प्रवासाबरोबर इतर सार्वजनिक प्रवासी सुविधांवर कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
मुंबई आणि पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. परिणामी, रेल्वेस्थानक परिसरात काही प्रमाणात शुकशुकाट दिसून येत आहे. कोरोनापूर्वी लातूरचे रेल्वेस्थानक गजबजलेले असायचे.