चाकूर : मागील दोन महिन्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर ई-पीक पाहणीचे नवीन संकट उभे ठाकले आहे. ‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ या उपक्रमांतर्गत ई-पीक पाहणी या स्वतंत्र ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे. त्यातच नोंदणीचे संकेतस्थळ सुरळीत चालत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. परिणामी, चाकूर तालुक्यातील ४७ हजार शेतकरी पीकपेरा नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत.
चाकूर तालुक्यात खरिपाची पेरणी ५७ हजार ९३८ हेक्टर्सवर झाली आहे. त्यात ४७ हजार १०९ शेतकरी आहेत. पेरा केलेल्या पिकाची ई-पीक पाहणी नोंदणी करणे हे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. ही नोंदणी करण्यासाठी ३० ऑगस्टची अंतिम तारीख जाहीर केली आहे. पाहणी नोंदणी न केल्यास पीक विमा, शासकीय अनुदान, पंतप्रधान सन्मान निधी तसेच राज्य सरकारच्या नमो किसान योजनाचा लाभ मिळणार नाही, असे असल्याने शेतकरी ई-पीक पाहणी करण्यावर भर देत आहेत.
ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल आहेत, त्यांना नोंदणी करता येणार आहे. परंतु, ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाइल नाही अशा शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पेरणी करून दोन महिने झाले असून, पावसाचा खंड पडल्याने खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. त्यातच ई-पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे ई-पीकपेरा करण्यासाठी शेतकरी प्राधान्य देत आहेत. मात्र, साइटवर वारंवार व्यत्यय येत असून, सर्व्हर काम करत नसल्याचे चित्र आहे.
संबंधित साइटवर अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या विभागांची नावे आहेत. परंतु, औरंगाबाद विभाग ओपन केला तर त्यात लातूर जिल्हा सुरू होत नाही. अधिक वेळ प्रयत्न केल्यास ओटीपी येतो. मात्र, पुढील प्रक्रिया होत नाही. शिवाय शेतशिवारांत इंटरनेटची समस्या असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पूर्वी पीकपेरा हा तलाठी करत असे. तशीच पद्धत राहावी, अशी मागणी यामुळे समोर येत असून, पीक पाहणीला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांवर नोंदणीची सक्ती नको...मागील आठ दिवसांपासून ई-पीक पाहणी करत आहे. मात्र, साइटवर लोड असल्याने वारंवार व्यत्यय येत आहे. कधी साइट सुरू झालीच तर ओटीपी येताे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होत नाही. शासनाने कृषी आणि महसूल विभागाकडून ई-पीक पाहणी करून घ्यावी. पावसाने दडी मारल्याने पिके हातातून जात आहेत. त्यामुळे नोंदणीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी समीर पाटील, विलास देशमाने यांनी केली आहे.
अडचणींवर मार्ग काढण्यात येणार...खरीप हंगामातील पिकांची शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी नोंदणी ऑनलाइन करायची आहे. यासाठी मोबाइल ॲपही उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या साइटच्या अडचणी येत असल्याच्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यातून निश्चितच मार्ग काढण्यात येणार असून, वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे चाकूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी सांगितले.