उदगीर (जि. लातूर) : दक्षिण मध्य रेल्वे विभागातील रेल्वेचा २६९ किलोमीटरचा लोहमार्ग विद्युतीकरण होऊन तयार आहे. मात्र या मार्गावर विद्युत इंजिनवर रेल्वे धावण्याची अद्यापही प्रतिक्षा आहे. त्यामुळे याबाबत कधी निर्णय होणार याची प्रतिक्षा लागली आहे.दक्षिण मध्य रेल्वे विभागातील २६९ कि.मी. अंतराचे विद्युतीकरण पुर्ण झाले. या मार्गाची टेस्टिंग यशस्वी झाली आहे. मात्र या मार्गावर अद्याप एकही रेल्वे विद्युत इंजिनावर धावली नाही.
दरम्यान, उदगीरहून हैदराबाद व मुंबईच्या दिशेचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे बिदर-मुंबई, हैदराबाद-हडपसर, लातूर-यशवंतपूर व सोलापूर-मुंबई यासह मालगाड्या विद्युत इंजिनवर धावण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वे विभागाने डिझेल इंजिन हद्दपार करून विद्दुतवर चालणारे इंजिन वापरण्यावर भर दिला आहे. यातुन पर्यावरण रक्षण, इंधन बचत व खर्च कपात असे उद्देश समोर ठेवण्यात आले आहेत.
दक्षिण मध्य रेल्वेने चार टप्प्यात विकाराबाद ते कोहिर, कोहिर ते खानापूर, खानापूर ते लातूर रोड व लातूर रोड ते परळीपर्यंत विद्दुतीकरण करिता सर्व यंत्रणा उभी केली. परळी रेल्वेस्थानक ते परभणी रेल्वे स्थानक दरम्यान पोखरणीपर्यंतही मार्ग विस्तारीत झाला. मात्र पोखरणी ते नांदेड मार्गावरील विद्दुतीकरण अद्याप प्रलंबित असल्यामुळे नांदेड-बंगळुरू, नांदेड-तिरुपती व पूर्णा-हैदराबाद रेल्वे अद्याप विद्दुत इंजिनवर धावू शकत नाही. शिवाय, परभणी ते औरंगाबाद लोहमार्ग विद्दुतीकरण प्रलंबित असल्यामुळे औरंगाबाद-तिरुपती, औरंगाबाद-हैदराबाद, शिर्डी-तिरुपती, जालना-तिरुपती, काकीनाडा-शिर्डी, सिकंदराबाद-शिर्डी गाड्या विद्दुत इंजिनवर धावू शकत नाही. सध्या २६९ कि.मी. विद्दुतीकरण झालेला मार्ग गाडी धावण्याच्या प्रतीक्षेत आहे.
रेल्वे संघर्ष समितीचा पाठपुरावा सुरु...पोखरणी ते नांदेड या लोहमार्गावर लवकर विद्दुतीकरण पूर्ण होऊन उदगीरमार्गे धावणाऱ्या सर्व गाड्या विद्दुत इंजिनवर धावू शकतील. यासाठी उदगीर रेल्वे संघर्ष समिती पाठपुरावा करीत आहे. परळी ते विकाराबाद मार्गावर परळीहुन सुटणारी किंवा विकाराबादहुन सुटणारी एकही गाडी नसल्याने हा मार्ग विद्दुतीकरण होऊनही गाडीच्या प्रतीक्षेत आहे. असे दक्षिण मध्य रेल्वे उपभोगता सल्लागार समिती सदस्य मोतीलाल डोईजोडे यांनी सांगितले.