दुष्काळाच्या मागणीसाठी हाती तिरंगा घेऊन माजी सैनिक टॉवरवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 08:44 PM2018-11-06T20:44:41+5:302018-11-06T20:45:21+5:30
दुष्काळाच्या मागणीसाठी औसा तालुक्यातील मंगरुळ येथील माजी सैनिक मनोहर पाटील हे मंगळवारी सकाळी ७ वाजता हाती तिरंगा घेऊन मोबाईल टॉवरवर चढले आहेत.
किल्लारी/नांदुर्गा : दुष्काळाच्या मागणीसाठी औसा तालुक्यातील मंगरुळ येथील माजी सैनिक मनोहर पाटील हे मंगळवारी सकाळी ७ वाजता हाती तिरंगा घेऊन मोबाईल टॉवरवर चढले आहेत. त्यांनी तेथेच उपोषणाला सदर मागणीसाठी प्रारंभ केला आहे. जोपर्यंत लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
दुष्काळ जाहीर करावा, पशुधनांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, चारा-पाण्याची व्यवस्था करावी आदी मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी माजी सैनिक मनोहर पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोबाईल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन सुरू केले आहे. घटनास्थळी ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी दाखल झाले आहेत.
मी काही आत्मदहन करण्यासाठी या टॉवरवर चढलो नाही, तर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे अनोखे आंदोलन करीत आहे. या भागातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी शासनाने तातडीने करावी. रबीची पेरणी हातून गेली आहे. खरिपाचे पीक हाती लागले नाही. शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था बिकट आहे. लातूर जिल्ह्यातील एकमेव शिरुर अनंतपाळ तालुक्यात शासनाने मध्यम दुष्काळ जाहीर केला आहे. हा निर्णय लातूर जिल्ह्यातील जनतेवर अन्यायकारक आहे, असे माजी सैनिक मनोहर पाटील म्हणाले. या आंदोलनाची दखल घेऊन गुबाळ, नांदुर्गा, मंगरुळ येथील ग्रामसेवक बिराजदार, तलाठी विजयकुमार उस्तुरे, नांदुर्गा येथील तलाठी किरणसिंग गहिरवार, पोलीस पाटील, ग्रामस्थ टॉवर परिसरात दाखल झाले आहेत. मात्र जोपर्यंत आपणास लेखी हमी दिली जाणार नाही, तोपर्यंत टॉवरवरील उपोषण थांबविणार नाही, अशी भूमिका माजी सैनिक मनोहर पाटील यांनी घेतली आहे.