क्राइम ब्रँचच्या ताेतया पाेलिस अधिकाऱ्याने वृद्धाला लुबाडले, गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Published: June 2, 2023 08:56 PM2023-06-02T20:56:53+5:302023-06-02T20:57:04+5:30
लातूर-मुरूड मार्गावरील घटना
राजकुमार जाेंधळे / लातूर : वाहन थांबवून ‘मी क्राइम ब्रँचचा पाेलिस अधिकारी आहे’ अशी बतावणी करत एका वृद्धाच्या बॅगमधील साेन्याच्या अंगठ्या, गळ्यातील लाॅकेट, असा १ लाख १० हजारांचा मुद्देमाल दिशाभूल करत लंपास केल्याची घटना लातूर- मुरूड मार्गावर घडली. याबाबत मुरूड पाेलिस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी बजरंग रंगलाल मंत्री (वय ६०, रा. पारूनगर, मुरूड, ता. लातूर) यांचे वाहन माेटारसायकलवरून आलेल्या अज्ञाताने ‘मी क्राइम ब्रँचचा पाेलिस अधिकारी आहे,’ अशी बतावणी करत, तुम्हाला आवाज दिलेला समजत नाही का? असे म्हणून त्यांना रुमाल काढायला लावत, त्यात तुम्ही तुमच्या हातातील घड्याळ, माेबाइल, अंगठ्या, गळ्यातील लाॅकेट, पाॅकेट काढून रुमालात बांधून बॅगमध्ये ठेवा, असे सांगून त्यांच्या हातातील बॅगमध्ये टाकावयास सांगितले.
यावेळी फिर्यादीची दिशाभूल करत रुमालातील दाेन ताेळ्यांचे साेन्याचे लाॅकेट आणि दाेन अर्धा ताेळ्याच्या अंगठ्या, असा एकूण १ लाख १० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ३० मे राेजी घडली. क्राइम ब्रँचचा ताेतया पाेलिस अधिकारी घटनास्थळावरून पसार झाल्यानंतर आपल्याला गंडविण्यात आल्याची फिर्यादीला जाणीव झाली. याबाबत मुरूड पाेलिस ठाण्यात धाव घेत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पाेलिस हेड काॅन्स्टेबल मस्के करत आहेत.