भाजप राज्यामध्ये विरोधी पक्षात आहे. मात्र, जिल्ह्यात भाजपचे मोठे प्राबल्य आहे. आज मजबूत असलेले संघटन अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न प्रत्येक कार्यकर्ता करत आहे. आगामी निवडणुकांमध्येही भाजप स्वबळावर झेंडा फडकवेल.
सध्या राज्य सरकारचे अस्तित्वच दिसत नाही. सर्वसामान्यांची कामे होत नाहीत, विकासाला गती नाही, घोटाळ्यांची चर्चा सुरू आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणासारख्या विषयांवर राजकारण न करता न्याय देण्याची भूमिका सरकारची दिसत नाही, असेही ते म्हणाले.
हातावर पोट असणाऱ्यांचे हाल...
कोरोना काळात हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले. अजूनही प्रश्न सुटलेले नाहीत. लाॅकडाऊनचे निर्णय त्या-त्या वेळी योग्य असले तरी सर्वसामान्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले नाहीत, असा आरोप करत माजी मंत्री निलंगेकर म्हणाले, हातावर पोट असणाऱ्या जनतेत रोष निर्माण झाला. लाॅकडाऊनला विरोध करणाऱ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. कोरोनाचा संसर्ग वाढताना रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. त्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना तुटपुंज्या ठरल्या. पुढील काळात अधिक सक्षम नियोजन होईल, अशी अपेक्षा आहे.
कोरोनाचे संकट आहे... जनतेने काळजी घ्यावी...
n कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे जनतेने काळजी घ्यावी. महामारीच्या संकटात राजकारण करायचे नाही, ही भूमिका भाजपची राहिली. परंतु, सरकार जिथे तत्परतेने काम करणार नाही, तिथे आम्ही निश्चितपणे जबाबदारी घेऊ. किंबहुना कोरोना काळात भाजप कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींनी आपले उत्तरदायित्व निभावले आहे. जे शक्य ते केले आहे. ऑक्सिजन, जीवनावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर आपापल्या भागातील लोकांना मदत करण्यासाठी कार्यकर्ते धावले आहेत. या पुढच्या काळातही माणुसकीची भावना जपून सर्वांनी एकमेकांच्या मदतीला गेले पाहिजे. यामध्ये भेदाभेद करण्याचे कारण नाही.
कोरोना प्रादुर्भाव काळात जिल्हा परिषदेचे काम...
माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, कोरोना काळात जिल्ह्यातील डाॅक्टरांनी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पथदर्शी काम केले. प्रामुख्याने जिल्हा परिषदेचा उल्लेख केला पाहिजे. जनतेने ज्या विश्वासाने जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात दिली आहे, त्या विश्वासाने पदाधिकाऱ्यांनी, आरोग्य विभागाने कुटुंब समजून रुग्णांची काळजी घेतली. प्रत्येक तालुक्यामध्ये कोविड केअर सेंटर उभे राहिले. ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध केल्या. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ ऑक्सिजन खाटा उपलब्ध करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले. तपासणी, उपचार आणि लसीकरण ही तिन्ही कामे जिल्हा परिषदेने उत्तम केली.
ऑक्सिजन व्हेंटिलेटरची सुविधा
कोरोना काळात आक्का फाऊंडेशनने मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या कामाची दखल सर्वसामान्यांपर्यंत आहे. या संदर्भात विचारले असता माजी मंत्री निलंगेकर म्हणाले, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर तशी यंत्रणा उभी करण्याचे काम जिल्हा परिषद, प्रशासन करत होते. दरम्यान, त्यांना आक्का फाऊंडेशननेही पाठबळ दिले. ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले. तालुक्याला व्हेंटिलेटर बेडही उपलब्ध केले.
जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ११४ कोटी मंजूर...
राज्य सरकारने काय केले हे सांगितले पाहिजे. केंद्र सरकारने विकासाची कामे सुरू ठेवली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे लातूर जिल्ह्यातील विविध नऊ रस्त्यांसाठी ११४ कोटी २७ लाखांचा निधी प्राप्त झाला. केंद्रीय रस्ते विकास निधीच्या माध्यमातून निलंगा तालुक्यात मांजरा नदीवर पूल होणार आहे. त्यासाठी ५६ कोटी ७० लाखांचा निधी मिळाला.
७ हजार कोटी गरिबांना द्या...
n १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरणाची जबाबदारी केंद्राने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला दिलासा दिला आहे. महाराष्ट्र शासनाला लसीसाठी ७ हजार कोटी खर्च करावे लागले असते. आता ही वाचलेली रक्कम राज्य सरकारने गरिबांना दिलासा देण्यासाठी पॅकेज स्वरूपात वापरावी, अशी मागणी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यापूर्वीच केली आहे. दरम्यान, लसीकरणासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.
रुग्णवाहिकांचे लोकार्पण...
nग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि सुविधा प्राप्त व्हावी म्हणून माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निधीतून आठ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी केली. त्यांनी महाराष्ट्रासाठी दोनवेळा ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना केली.
विद्यालय, रुग्णालयाचे नाविन्यपूर्ण प्रयोग...
nमाजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, शिक्षणावर सर्वाधिक लक्ष दिले पाहिजे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण हा पर्याय होता. आता विद्यार्थ्यांसाठी ब्रीज कोर्स होणार आहेत. परंतु, लोकप्रतिनिधी म्हणून गाव तिथे उत्तम शाळा आणि सुसज्ज भौतिक सुविधा असल्या पाहिजेत, याकरिता आम्ही आग्रही आहोत.
nनिलंगा मतदारसंघात प्रयोगशील शिक्षकांनी आपल्या शाळा बोलक्या केल्या आहेत. त्यांना सदैव पाठबळ दिले जाईल. शिक्षणामुळेच ग्रामीण भागातील चित्र बदलू शकते. तसेच रुग्णालयांचा चेहराही बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे.