लामजन्यात चाैरंगी लढत, स्थानिक पुढारी आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:00 AM2021-01-08T05:00:02+5:302021-01-08T05:00:02+5:30
औसा तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. लामजना ग्रामपंचायत ही १७ सदस्यांची असून एकूण ६ प्रभाग आहेत. यातून ९ ...
औसा तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. लामजना ग्रामपंचायत ही १७ सदस्यांची असून एकूण ६ प्रभाग आहेत. यातून ९ महिला व ८ पुरुष उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. गावातील मतदारसंख्या ही ५ हजार ७०० एवढी आहे. ही निवडणूक पाणी, रस्ता, गटारी, विद्युत अशा मूलभूत समस्यांवर केंद्रित होत आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांकडून या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले जात आहे.
लामजना येथील ग्रामपंचायतीच्या आजपर्यंतच्या निवडणुका ह्या दुरंगी झाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत नवख्या चेहऱ्यांची संख्या वाढल्याने चौरंगी लढत होत आहे. पापामियॉ पटेल यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनल, ज्ञानेश्वर चिल्ले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपरिवर्तन पॅनल, नजीर पटेल यांचे पटेल विकास पॅनल तर बालाजी पाटील यांचे लोककल्याण ग्रामविकास पॅनल रिंगणात आहेत. या पॅनलकडून एकूण ५४ उमेदवार निवडणुकीच्या फडात शड्डू ठोकून उभे आहेत. दरम्यान, प्रत्येक पॅनलकडून प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवार गावच्या विकासावर लांबलचक भाषणे ठोकत आहेत.
मूलभूत समस्यांवर लक्ष...
लामजना येथील ग्रामपंचायत निवडणुकीत चार पॅनल आहेत. सर्वच पॅनलकडून मूलभूत सुविधा सोडविण्याचे आश्वासन दिले जात आहे. गावास पाणी आहे. परंतु, नियोजन नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते. याशिवाय, रस्त्यांची समस्या आहे. गटारी नसल्याने व काही ठिकाणच्या तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. याशिवाय, विजेची समस्या कायम आहे. या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
चौघे अपक्ष आजमाविताहेत नशीब...
चार पॅनलकडून एकूण ५४ उमेदवार आहेत. यात ग्रामविकास पॅनलचे ९, ग्रामपरिवर्तनचे १७, पटेल विकास पॅनलचे ११, लोककल्याण ग्रामविकास पॅनलचे १७ उमेदवार आहेत. त्यातच चार अपक्ष आपले नशीब आजमावित आहेत. निवडणुकीत तरुण उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे उत्साह वाढला असल्याने रंगत वाढत आहे.