शिरूर-अनंतपाळ शहरास घरणी धरणावरून पाणी पुरवठा होतो. ऐन पावसाळ्यात पाणी पुरवठ्याची यंत्रणा कोलमडली आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी विविध प्रभागातील नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडे वेळोवेळी करून निवेदन दिले. परंतु, त्याकडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे पंधरा दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नागरिकांना घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या अशा कारभाराचा निषेध करण्यासाठी सोमवारी शहरातील विविध प्रभागातील नागरिक, महिला, युवकांनी येथील महात्मा बसवेश्वर चौकातून मुख्य रस्त्याने रिकाम्या घागरी घेऊन नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडून रिकाम्या घागरी उलट्या दिशेने उंचावत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी अशोक कोरे, बाबूराव तोरणे, आनंदा कामगुंडा, गोपाळ हंद्राळे, अनंत काळे, अमर आवाळे, औदुंबर सिंदाळकर, उदय बावगे, पांडुरंग ऐतनबोने, सुलभा ऐतनबोने, संदीप धुमाळे, गोविंद श्रीमंगल, संभाजी हत्तरगे, महादेव खरटमोल, सचिन गुगळे, शुभम ऐतनबोने, प्रसाद शिवणे, महादेव आवाळे, विठ्ठल चाळकीकर, हणमंत जगताप, मकबुल तांबोळी, यश दुरूगकर, सुचित लासुने, उदय बावगे, केदार लोंढे, सतीश शिवणे आदींची उपस्थिती होती.
पाणीपुरवठा लवकर सुरू करा...
शिरूर-अनंतपाळ शहरासाठी घरणी प्रकल्पावरून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा. अन्यथा पुन्हा हालगी नाद मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागास देण्यात आलेल्या लेखी निवेदनात दिला आहे.
विद्युत जोडणीसाठी महावितरणला पत्र...
घरणी प्रकल्पावरून शिरूर-अनंतपाळ शहरासह विविध पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर गावातील पाणी पुरवठा योजनेचे वीजबिल थकित आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यासाठी नगरपंचायतच्यावतीने महावितरणला पत्र देऊन शिरूर-अनंतपाळचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी केल्याचे पाणी पुरवठा अभियंता व्ही. एस. विभुते, सोमनाथ जांगठे यांनी सांगितले.