ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी केवळ एकच अर्ज दाखल झाला होता. दरम्यान, जळकोट तालुक्यातील तिरूका ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे. लातूर तालुक्यातील ६४, औसा- ४६, निलंगा- ४८, शिरूर अनंतपाळ- २७, देवणी- ३४, उदगीर- ६१, अहमदपूर- ४९, जळकोट- २७ आणि चाकूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींनी विकासासाठी जिल्हा परिषदेकडून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांचा लोहारा गट
लोहारा गटातून राहुल केंद्रे हे विजयी झाले होते. त्यांची जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टर्ममध्ये अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी सुनील केंद्रे यांचा पराभव केला आहे. लोहारा, कुमठा खु., होनी हिप्परगा, क्षेत्रफळ, हंगरगा, इस्मालपूर, एकुर्कारोड, किनी यल्लादेवी या ग्रामपंचायती लोहारा गटात असून तिथे निवडणूक होत आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडून बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू आहेत.
महिला व बालकल्याण सभापतींचा निडेबन गट
निडेबन गटातून ज्योतीताई राठोड यांनी काँग्रेसच्या सूर्यशीला मोरे यांचा पराभव करून विजय मिळविला होता. या गटातील निडेबन, शेल्हाळ, मादलापूर, शिरोळ जानापूर, कौळखेड, मल्लापूर, माळेवाडी, चांदेगाव, लिंबगाव, गुरदाळ, कुमदाळ या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. बिनविरोध निवडीसाठी पाच लाखांचा निधी राठोड यांनी जाहीर केला आहे.
जिल्हा परिषद उपाध्यक्षांचा अंबुलगा गट
या गटाच्या सदस्या भारतबाई सोळुंके यांनी काँग्रेसच्या राखी शेळके यांचा ५७० मतांनी पराभव केला होता. या गटातील हंचनाळ, नदीवाडी, आनंदवाडी (अबु.), वळसांगवी, केळगाव, जाजनूर, गुऱ्हाळ , शिऊर या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. गटातील ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात म्हणून त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
समाजकल्याण सभापतींचा जानवळ गट
या गटातून रोहिदास वाघमारे यांनी राष्ट्रवादीचे उमाकांत कांबळे यांचा पराभव केला होता. या गटातील दापक्याळ, झरी खु., म्हाळंगी, केंद्रेवाडी, हाडोळो, कडमुळी येथील ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या गटात पॅनल उभारणीला वेग आला असून, चुरस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
.