हडोळती हे मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. त्यामुळे येथे खरेदीसाठी नागरिकांची नेहमी रेलचेल असते. मात्र, येथील मुख्य रस्ता, बसथांबा आणि गावातील मुख्य चौकातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काही व्यावसायिकांची दुकाने आहेत. हे व्यावसायिक आपल्या दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. तसेच हातगाडे व्यावसायिक रस्त्यावर थांबतात. त्यामुळे रहदारीचा प्रश्न गंभीर होत आहे.
गावातील प्रमुख चौकांमध्ये व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी, उसाने भरलेले ट्रक, इतर छोटी- मोठी वाहने या मार्गावरून चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे येथे दररोज छोटे-मोठे अपघात वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री मुख्य रस्त्यावरील विजेच्या खांबाला अज्ञात वाहनाने धडक दिली. दुसरा अपघात मुख्य चौकात घडला. सकाळी ७ ते १० वा. पर्यंत आणि दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत चौकात ग्राहकांची गर्दी असते. अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. काही व्यावसायिकांनी दुकानासमोर पोटभाडेकरू ठेवले आहेत.
नोटिसा देण्यात येतील...
अतिक्रमण केलेल्या सर्व व्यावसायिकांना नोटिसा देऊन रहदारीचा प्रश्न गांभीर्याने सोडविण्यात येईल. त्याकडे कोणी दुर्लक्ष केल्यास पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेऊन रस्ता अतिक्रमणमुक्त केला जाणार असल्याचे सरपंच शंकुतला भोगे, उपसरपंच इंदूताई पवार यांनी सांगितले.