जळकोट : जळकोट शहरासह तालुक्यातील एकुर्का, सिंदगी येथे कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाचा आलेख उंचावून तो १ हजार ३५९ वर पोहोचला. वेळीच औषधोपचार करण्यात आल्याने १ हजार १ जण ठणठणीत बरे झाले आहेत.
तालुक्यात एकूण ४७ गावे असून प्रत्येक गावांपर्यंत कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. गेल्या वर्षी तालुक्यातील २० गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले होते. मात्र, यंदा संसर्ग वाढला आहे. हा प्रादुर्भाव राेखण्यासाठी आरोग्य, महसूल, पंचायत समिती, पोलीस प्रशासनाने जनजागृतीबरोबरच नागरिकांना शासन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. नियमांचे पालन न करणा-यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. तसेच आरोग्य विभागाचे पथक सर्वाधिक रुग्णसंख्या आढळणा-या गावांत तळ ठोकून आहे. कोविड चाचण्यांवर भर दिला जात आहे.
तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी वारंवार प्रशासनास निर्देश दिले. त्यामुळे आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी वारंवार बैठका घेऊन सूचना केल्या. त्यामुळे जनजागृती वाढून रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यास आणखीन मदत झाली.
ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार म्हणाले, कोविड चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. लसीकरणावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक गावात आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकाची तपासणी करून औषधोपचार दिले जात आहेत. कोरोनाची लक्षणे दिसून येणा-यांना तपासणी करून घेण्यासाठी समजावून सांगण्यात येत आहे. सर्वांनी नियमांचे पालन करावे. ६ मिनिटांची वॉकिंग टेस्ट करावी.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर...
प्रत्येकाने शासन नियमांचे पालन करावे. तसेच मास्कचा वापर करावा. अनावश्यक घराबाहेर पडणे बंद करावे म्हणून गावात जनजागृती करण्यात येत आहे. तसेच कोविड रुग्ण आढळून आल्यास अथवा तशी लक्षणे दिसून आल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ चाचणी करुन घेण्यात येत आहे, असे मंगरूळचे सरपंच महेताब बेग, रावणकोळाच्या सरपंच ज्योत्स्ना पाटील दळवे यांनी सांगितले.
३३४ ॲक्टिव्ह रुग्ण...
तालुक्यात १ हजार ३५९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी १००१ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. १४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. होम आयसोलेशनमध्ये २९७ आहेत. २९ कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. ३९ जणांना रेफर करण्यात आले आहे.
जळकोट- ९८, एकुर्का- ८८, सिंदगी- ४८, धामणगाव- ३६, लाळी २५.