जळकाेट तालुक्यातील साेयाबीनबराेबरच तुरीचा पेराही माेठ्या प्रमाणावर घेतला जाताे. तुरीचे माेठ्या प्रमाणात उत्पादन मिळते, यासाठी नगदी पीक म्हणून साेयाबीन, ऊस आणि तुरीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जातेे. यंदा मात्र तुरीवर विविध राेगांचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीचा खराटाच झाला. शेतकऱ्यांच्या तुरीचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपला सात-बारा सावकाराकडे गहाण ठेवण्याची वेळ आली आहे.
पावसामुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला. शेतकऱ्यांचे मुख्य पीक सोयाबीन, तूर समजले जाते. मात्र, जळकाेट तालुक्यात दोन्ही पिकांना फटका बसल्याने अक्षरश: वेळा अमावास्येला भज्जीसाठी तूर मिळणार नाही, असे चित्र आहे. शासनाकडून खूपच कमी अनुदान देण्यात आले आहे. लाखो रुपयांच्या सोयाबीनचे नुकसान झाले आहे. मात्र, अनुदान पाच हजारांच्या घरातच आहे. शेतकऱ्यांची मदार तुरीच्या पिकावर हाेती. मात्र, ती आता फाेल ठरली आहे. निसर्गाने शेतकऱ्यांच्या ताेंडचा घास हिरावून घेतला आहे. शेतामध्ये सध्या फक्त खराटा दिसून येत आहे. परिणामी, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाकडून अद्यापही या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले नाहीत.
हेक्टरी २५ हजारांचे अनुदान द्या
सोयाबीन, तूर आणि ज्वारीचे पीक गेले आहे. त्यामुळे जळकाेट तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात अडकला आहे. सध्याला बाजारात प्रतिक्विंटल तुरीला सहा हजारांचा भाव आहे. सोयाबीनचा भाव ४ हजार १०० आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तुरीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत संबंधित तहसीलदारांना आदेश द्यावा, नुकसानभरपाईपोटी हेक्टरी २५ हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रमाकांत रायवार, नगरसेवक शिवानंद देशमुख, कादरभाई लाटेवाले, धोंडिराम पाटील, तुकाराम केंद्रे, कॉ. राजीव पाटील, गोविंदराव पाटील, रामराव शिंदे, रमेश पारे, दिलीप कांबळे, सत्यवान पांडे, साहेबराव पाटील, येवले, चंद्रकांत गव्हाणे आदींनी केली आहे.