‘जंकफुड’मुळे लहान मुलांमध्ये बळावताहेत पोटविकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 01:46 PM2018-12-26T13:46:14+5:302018-12-26T13:51:43+5:30

जंकफूडमुळे लहान मुलांमध्ये पोटविकार बळावत असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ डॉ. सोनटक्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

'Junkfood' is causing Stomach disorders in children! | ‘जंकफुड’मुळे लहान मुलांमध्ये बळावताहेत पोटविकार !

‘जंकफुड’मुळे लहान मुलांमध्ये बळावताहेत पोटविकार !

Next
ठळक मुद्देयातील केमिकल्समुळे बालकांच्या आरोग्यांवर विपरित भूक मंदावण्याचे प्रमाणही वाढले

उस्मानाबाद : हट्ट धरला की, पालकही मागेपुढे न पाहता अन् दुष्परिणामांचा विचार न करता, पाकीटबंद चटकदार खाद्यपदार्थ मुलांच्या हाती सोपवून मोकळे होतात. परंतु, असे पाकिटबंद पदार्थ दीर्घकाळ टिकावेत, यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्समुळे बालकांच्या आरोग्यांवर विपरित परिणाम होऊ लागला आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये पोटविकार बळावत असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ डॉ. सोनटक्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

प्रश्न : सध्या लहान मुलांमध्ये कोणकोणते आजार आढळून येतात?
सोनटक्के : लहान मुलांमध्ये निमोनिया, गॅस्ट्रो, टायफाईड, डेंग्यू, गोचीडताप यासारखे नेहमीचे आजार आढळून येतात. परंतु, मागील काही वर्षात पोटविकाराचे प्रमाण अधिक वाढले आहे. प्रतिदिन दाखल होणाऱ्या पेशेन्टपैकी दहा ते बारा टक्के बालके या विकाराने त्रस्त असतात.

प्रश्न : पोटविकाराचे प्रमाण नेमके कशामुळे वाढतेय?
सोनटक्के : सध्या बाजारामध्ये पाकिटबंद जंकफुडची काही कमी नाही. वरतून मुलांना आकर्षित करण्यासाठी खेळण्यांचाही वापर केला जात आहे. त्यामुळे अनेक मुले खेळण्यांसाठी अशा पाकिटबंद खाद्य पदार्थांचा पालकांकडे हट्ट करतात. अशावेळी पालकही त्यांची समजूत काढण्याच्या फंद्यात पडत नाहीत. पाच-दहा रूपयांचे जंकफुडचे पाकिट हाती सोपवून मोकळे होतात. हे पदार्थ चटकदार असतात. त्यामुळे मुलेही ते आवडीने खातात. आणि येथेच या आजाराचे मूळ दडले आहे. हे खाद्यपदार्थ जास्तकाळ टिकावेत यासाठी वापरलेले वेगवेगळे केमिकल्स पोटविकारास कारणीभूत ठरतात.

प्रश्न : जंकफुड टाळण्यासाठी काय करायला हवे?
सोनटक्के : लहान मुल हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असते. त्याला आकार द्यावा तसे ते घडते. त्यामुळे मुलांना संबंधित जंकफुडमुळे होणाऱ्या आजारांबाबत सांगणे गरजेचे आहे. त्यांना त्यांच्या भाषेत पटवून दिल्यास नक्कीच ते ऐकतात. यानंतरही काही बालके जंकफुडचा हट्ट सोडतच नसतील, तर त्यांचा हट्ट सहजासहजी पूर्ण करू नये. हट्ट करूनही आपले बाबा पाकिटबंद पदार्थ  देत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर मुलांतील हट्टी वृत्ती बऱ्यापैकी कमी होते.

प्रश्न : जंकफुडच्या अतिसेवनाने आणखी कोणते दुष्परिणाम उद्भवतात?
सोनटक्के : लहान मुले ही दिवसभर खेळण्या-बागडण्यात दंग असतात. त्यामुळे मुलांना नियमित भूक लागणे अपेक्षित असते. परंतु, जी मुले जास्त जंकफुड खातात, त्यांच्यामध्ये पोटविकारासोबतच भूक मंदावण्यासारखे दुष्परिणामही आढळून येऊ लागले आहेत. ही बाब अत्यंत घातक आहे. मुलांमधील भूक मंदावल्यास त्यांच्या आरोग्यावर दुरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे पालिकांनी जंकफुडबाबत वेळीच जाकरूक होणे गरजेचे आहे.

प्रश्न : आपण पालकांसाठी काही सल्ला देऊ इच्छिता का?
सोनटक्के : होय, नक्कीच. मुलांच्या दैनंदिन आहारामध्ये फळांचा अधिकाधिक उपयोग करायला हवा. फळांसोबतच पौष्टिक आहारावरही भर देणे गरजेचे आहे. घरगुती पदार्थ रूचकर बनविल्यास मुले, ते आवडीने खातात. ज्या मुलांच्या आहारात पौष्टिक अन्न अधिक असते, अशी मुले फारशी आजारी पडत नाहीत.

Web Title: 'Junkfood' is causing Stomach disorders in children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.