खरोश्याचा पाणीप्रश्न कायम, निवडणुकीत आश्वासनांची खैरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:16 AM2020-12-26T04:16:31+5:302020-12-26T04:16:31+5:30
खरोसा : औसा तालुक्यातील खरोसा गावचा विस्तार होऊन २५ वर्षे झाली. यात ग्रामपंचायतीच्या ५ पंचवार्षिक निवडणुका झाल्या. मात्र, ...
खरोसा : औसा तालुक्यातील खरोसा गावचा विस्तार होऊन २५ वर्षे झाली. यात ग्रामपंचायतीच्या ५ पंचवार्षिक निवडणुका झाल्या. मात्र, गावचा पाणीप्रश्न अद्यापही कायम आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
खरोसा येथील पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून, साडेअकरा कोटी खर्चून राज्य शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत मसलगा मध्यम प्रकल्पातून २००६ मध्ये सहा खेडी पाणीपुरवठा योजना सुरू केली. परंतु, ही योजना कधी वीजबिलामुळे तर कधी पाण्याअभावी बंद पडली. त्यामुळे काही वेळेस गावकऱ्यांना पावसाळ्यातही पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागले. गावातील काही वस्तीत सध्या सुरळीत पाणीपुरवठा नाही. कधी १५ दिवसांआड तर कधी महिन्याने पाणी मिळत आहे. दरम्यान, विधानसभा, ग्रामपंचायत निवडणुकीच्या कालावधीत पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले जात आहे. परंतु, निवडणुका झाल्या की, आश्वासन हवेतच विरत आहे. या निवडणुकीत पाण्याचा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आजही विकत पाणी...
यंदा मसलगा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र, अद्यापही खरोसा गावाला प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू नाही.
गावातील काही वस्त्यांत आजही पाणी विकत घ्यावे लागते आहे. ८०० ते एक हजार लिटर पाण्यासाठी दीडशे रुपये मोजावे लागत आहेत.