लातूर ग्रंथोत्सवास प्रारंभ; ग्रंथ हे आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावतात: रमेश बियाणी
By हरी मोकाशे | Published: March 4, 2024 07:04 PM2024-03-04T19:04:08+5:302024-03-04T19:04:21+5:30
आपल्या विचारांची जडणघडण होण्यात ग्रंथ दिशादर्शक ठरतात.
लातूर : ग्रंथ हे आपल्याला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळविषयक ज्ञान देतात. आपली संस्कृती, समाजाची जडणघडण ग्रंथांमुळे समजते. त्यामुळे ग्रंथ हे मानवी जीवनात मार्गदर्शकाची भूमिका बजावितात, असे प्रतिपादन दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य व लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद सभागृहात आयोजित लातूर ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार भारत सातपुते होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के, ज्येष्ठ साहित्यिक रमेश चिल्ले, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले, जिल्हाध्यक्ष प्रभाकर कापसे, प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड, कालिदास माने आदी उपस्थित होते.
बियाणी म्हणाले, मानवी जीवनात प्रगतीचे विविध टप्पे आले. या सर्व टप्प्यांचे ग्रंथ हे साक्षीदार आहेत. आपल्या विचारांची जडणघडण होण्यात ग्रंथ दिशादर्शक ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथ वाचनाची आवड जोपासली पाहिजे. यावेळी सातपुते म्हणाले, ग्रंथांशी घट्ट मैत्री केल्यास आपल्याला जगण्याचे बळ, नवी दिशा आणि नव्या प्रेरणा मिळतात. त्यामुळे आयुष्यात इतर अनावश्यक बाबींपेक्षा ग्रंथ वाचनाला अधिक महत्व दिले पाहिजे. यावेळी धनंजय गुडसूरकर, रमेश चिल्ले यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी, सूत्रसंचलन पी.सी. पाटील यांनी केले. आभार हरिश्चंद्र डेंगळे यांनी केले. ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले.
ग्रंथदिंडीने उत्साहात प्रारंभ...
‘लातूर ग्रंथोत्सव’ची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून झाली. ग्रंथदिंडीचे पूजन जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष डॉ. ब्रीजमोहन झंवर, डॉ. आरती झंवर, प्राचार्य डी.एन. केंद्रे, कालिदास माने, संजय मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदिंडीत साने गुरुजी विद्यालय, राजमाता जिजामाता विद्यालय, श्री विद्यालयातील विद्यार्थी विविध वेशभूषेत सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले.