कुस्ती लीग स्पर्धेत घुमणार लातूरचा आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 05:51 PM2018-10-30T17:51:18+5:302018-10-30T17:52:42+5:30
लातूरच्या कुस्तीपटूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर अनेक मैदाने गाजविली आहेत.
- महेश पाळणे
लातूर : राज्यभरातच नव्हे, तर देशभरात लातूरच्याकुस्तीची ओळख परिचित आहे. लातूरच्या कुस्तीपटूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर अनेक मैदाने गाजविली आहेत. या खेळात लातूरचा नेहमीच बोलबाला असतो. आता नव्याने होणाऱ्या महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेसाठी लातूरच्या काका पवारसह सागर बिराजदार व पंकज पवारची वर्णी लागली आहे. त्यामुळे या स्पर्धेतही लातूरचा आवाज नक्कीच घुमणार.
लातूरच्या कुस्तीने अनेक रत्ने घडविली आहेत. त्यामुळे लातूरचे नाव कुस्तीत दूरवर पोहोचले आहे. ध्यानचंद, अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेते अनेक मल्ल लातूरने दिले आहेत. त्यामुळे लातूरच्या खेळाडूंचा दबदबा आहे. २ ते १८ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र कुस्ती दंगल लीग स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेत सहा संघ राहणार असून, राज्यातील अव्वल दर्जाचे ७२ खेळाडू यात आपले कसब पणाला लावणार आहेत. ही स्पर्धा पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात होणार आहे. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता राहुल आवारेसह ज्योतिबा अटकळे, माऊली जमदाडे, उत्कर्ष काळे, विक्रम कुºहाडे, कौतुक ढाफळे, किरण भगत हे अव्वल मल्ल यात सहभागी राहणार आहेत. यामध्ये लातूरच्या सागर बिराजदार व पंकज पवार या दोन खेळाडूंचा समावेश असून, स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून अर्जुनवीर काका पवार हे राहणार आहेत.
विविध वजन गटात ही स्पर्धा होणार असून, विजेत्यांना भरघोस बक्षिसे मिळणार आहेत. स्पर्धेत निवडलेल्या खेळाडूंना या लीग स्पर्धेमुळे मोठे आर्थिक पाठबळ मिळणार आहे. एकंदरित, या कुस्ती लीग स्पर्धेत लातूरचा आवाज घुमणार आहे.
सई ताम्हणकरच्या संघात सागर...
कोल्हापुरी मावळे नावाने असलेला संघ मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा असून, या संघात ८६ किलो वजनी गटात लातूरचा सागर बिराजदार प्रतिनिधित्व करणार आहे. यासह साईचा पंकज पवार पुणेरी उस्ताद संघात राहणार आहे. या स्पर्धेत वीर मराठवाडा संघ मालक म्हणून नागराज मंजुळे राहणार आहेत. यासह अभिनेते स्वप्नील जोशी यांचाही संघ ‘विदर्भाचे वाघ’ या नावाने असणार आहेत.
गुणवान खेळाडू...
रामलिंग मुदगडचा सागर बिराजदार मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मॅट विभागात उपविजयी ठरला आहे. यासह अखिल भारतीय विद्यापीठ व वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्ण पटकाविले आहे. यासह साईचा पंकज पवार याने शालेय राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले आहे. १९ वर्षे वयोगटात तो राज्याचा बेस्ट रेसलर म्हणून उदयास आला आहे.