लातूरला हवे व्हॉलीबॉलचे इनडोअर मैदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:20+5:302021-07-07T04:25:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : व्हॉलीबॉल खेळात लातूरचा दबदबा आहे. अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारून लातूरचे नाव उज्ज्वल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : व्हॉलीबॉल खेळात लातूरचा दबदबा आहे. अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारून लातूरचे नाव उज्ज्वल केले आहे. वरिष्ठ गटातही लातूरची टीम अनेक वेळा पात्रता फेरी गाठते. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी व्हॉलीबॉलपटूंना स्वतंत्र इनडोअर मैदानाची गरज असून, पाऊस व अन्य व्यत्ययापासून सरावासाठी हे मैदान गरजेचे आहे. व्हॉलीबॉलपटूंना इनडोअर स्टेडियमची सोय झाली तर निश्चितच या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर लातूरचे खेळाडू चमकतील.
उस्मानाबाद जिल्ह्यात असल्यापासून लातूरच्या खेळाडूंचा राज्य व राष्ट्रीय पातळीवर दबदबा आहे. जिल्हा स्वतंत्र झाल्यानंतर लातूरच्या खेळाडूंनी अनेकवेळा व्हॉलीबॉल खेळात उच्चतम कामगिरी केली आहे. शालेय स्पर्धा असो की संघटनेची स्पर्धा. लातूरच्या खेळाडूंनी अनेकवेळा मैदान मारले आहे. नांदेड विद्यापीठातही लातूरच्याच खेळाडूंचा या खेळात बोलबाला असतो. त्यामुळे लातूरचा व्हॉलीबॉल प्रसिद्ध आहे.
लातूरच्या इरफान शेखने व्हॉलीबॉल खेळात आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. यासह रहिम शेख, फाजिल शेख, महेश पाळणे, शोएब शेख यांनी भारतीय संघाच्या सराव शिबिरात सहभाग घेतला होता. यासह शालेय स्पर्धेतही लातूर जिल्ह्यातील वाढवणा येथील खेळाडूंनी अनेकवेळा चॅम्पियनशीप पटकाविली आहे. मात्र, व्हॉलीबॉलचे जिल्ह्यात इनडोअर मैदान नसल्याने व्हॉलीबॉलचा विकास खुंटला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हॉलीबॉलच्या स्पर्धा इनडोअर स्टेडियमवर होतात. त्यामुळे हे मैदान लातूरसाठी महत्त्वाचे आहे.
विभागाचे ठिकाण...
लातूर हे क्रीडा क्षेत्रात विभागाचे ठिकाण आहे. लातूरसह उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यांचा यात समावेश आहे. शालेय स्पर्धेसाठीही इनडोअर व्हॉलीबॉल मैदान झाले तर विभागीय व राज्य स्पर्धा घेण्यास या मैदानाची गरज पडेल. विभागीय संकुलाचे अद्यापि काम सुरू नाही. झाले तरी ते शहरापासून दूर असेल. त्यामुळे व्हॉलीबॉलपटूंसाठी शहरातच इनडोअरची सोय व्हावी, अशी अपेक्षा व्हॉलीबॉलप्रेमींची आहे.
वरिष्ठ गटात दबदबा...
व्हॉलीबॉल खेळात लातूरचा संघ प्रतिवर्षी उत्तम कामगिरी करतो. कोरोनामुळे गेल्यावर्षी स्पर्धा झाली नसली, तरी तत्पूर्वी लातूरच्या संघाने वरिष्ठ स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. यासह अनेकवेळा लातूरच्या संघाने पात्रता फेरी गाठत उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. कनिष्ठ गटातही लातूरच्या खेळाडूंनी छाप सोडली आहे.
व्हॉलीबॉलचे अनेक क्लब
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हॉलीबॉल चालतो. शहरात व्हॉलीबॉलचे महाराष्ट्र क्लब व फ्रेंडस् क्लब असे दोन मुख्य संघ आहेत. यासह व्हॉलीबॉलचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाढवण्यात तर व्हॉलीबॉलचा जुनून आहे. यशवंत क्लब व स्टार क्लब याचा प्रामुख्याने समावेश आहे. यासह मुरुड, निलंगा, जळकोट, अहमदपूर या ठिकाणीही व्हॉलीबॉल प्रामुख्याने चालतो.
निर्मिती योजनेतून सहाय्य करू...
क्रीडा सुविधा निर्मिती योजनेअंतर्गत व्हॉलीबॉलच्या इनडोअर मैदानासाठी सहाय्य करू. यासाठी महापालिकेने जागा देणे आवश्यक असून, ७० टक्के शासन तर ३० टक्के महापालिकेने खर्च करणे गरजेचे आहे.
- महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडाधिकारी
महापालिका सर्वतोपरी मदत करेल...
व्हॉलीबॉलचा लातूरला इतिहास आहे. लातूरचे खेळाडू पुढे जावेत ही अपेक्षा आहे. यासाठी महापालिका जागा उपलब्ध करून देईल. क्रीडा सुविधा निर्मिती योजनेअंतर्गत लातुरात व्हॉलीबॉलसाठी स्वतंत्र इनडोअर हॉल उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करू.
- विक्रांत गोजमगुंडे, महापौर