आवलकोंडा येथे ३० लाखांची दारु जप्त; दोघा जणांना अटक
By संदीप शिंदे | Published: July 8, 2023 05:37 PM2023-07-08T17:37:52+5:302023-07-08T17:38:19+5:30
ग्रामीण पोलिसांची कारवाई; ट्रकसह मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात
उदगीर : येथील ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करीत ३० लाखांच्या दारूसह ५३ लाखांचा माल जप्त केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले, शनिवारी पहाटे आवलकोंडा पाटी येथे देशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. ट्रक क्रमांक के.ए. ०१ एई ६८२२ ची तपासणी केली असता दारू वाहतुकीबाबत कुठलाही परवाना नसल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पंचांच्या समक्ष ८७० बॉक्स देशी दारू, किंमत ३० लाख ४५ हजार व २१ लाख रुपये किंमतीचा ट्रक व इतर साहित्य असे ५२ लाख ९९ हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी रफीदीन ईस्माईल ए., (वय ५२ रा. बारदीनगर, कोईम्बतूर, तामिळनाडू) व विजयन कृष्णकुट्टी अल्कपरम्बील (वय ६१ रा. उडीकल, केरळ) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल, स्थानिक गुन्हे शाखेचे राम बनसोडे, नागरगोजे, तुळशीराम बुरुरे, नाडागुडे आदींनी केली.