लोकमत न्यूज नेटवर्क उदगीर (जि. लातूर): भाजपाने उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले. गेल्या ४५ वर्षांत देशात बेरोजगारी उच्चांकी असून, ३० लाख पदे रिक्त ठेवली. शेती उत्पादनांवर जीएसटी लावली, ६०० शेतकरी शहीद झाले. अन् ते लहान मुलांसारखे ७० वर्षांवर तेच ते कितीदा बोलणार. तुम्ही १० वर्षांत काय केले ते सांगा. नौटंकी नहीं, सच्चाई चलेगी', असा घणाघात करीत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी- वाड्रा यांनी 'अब की बार जनता की सरकार' हा नारा शनिवारी येथे दिला.
काँग्रेस उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ उदगीर येथे आपल्या महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचार सभेत प्रियंका म्हणाल्या, टी.व्ही. आणि जाहिरातींमध्ये दिसते ते सत्यनाही, तुम्ही जे रोज जगता ते सत्य आहे.
महागाई वाढली, शेतमालाला भाव नाही, महिला, दलित सुरक्षित नाहीत आणि पंतप्रधान जगभ्रमण करीत आहेत. भाजप सरकारने महाराष्ट्रात पक्षांतराचा पायंडा पाडला. करोडोरुपयांना आमदारांची खरेदी झाली. तुम्ही निवडून दिलेले सरकार पाडले, हे सरकार ६० टक्क्यांचे आहे, असे प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या.
पीएमपदाची प्रतिष्ठा...
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पदाची उंची वाढविली, ती प्रतिष्ठा आता कमी करून अहंकार तेवढा दिसत आहे. जात व धर्मावर मतदान करणार का? असा सवाल प्रियंका यांनी विचारला.
काँग्रेस गॅरंटी देते...
३० लाख रिक्त पदे भरु, शेती उत्पादने जीएसटीमुक्त करू, पाच हजार कोटींचा निधी उभारून रोजगार देऊ, हमीभावाचा कायदा करू, कर्जमाफीसाठी कायमस्वरूपी आयोग नेमू, असे आश्वासन त्यांनी दिले.