लम्पीमुळे पशुपालक धास्तावले; १० महिन्यांच्या गोऱ्ह्याचा मृत्यू, गायीलाही झाली लागण
By आशपाक पठाण | Published: July 8, 2023 05:49 PM2023-07-08T17:49:23+5:302023-07-08T17:49:43+5:30
वर्षभरापूर्वी जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव अनेक पशुधनांत आढळून आल्याने पशुपालकांची तारांबळ उडाली होती.
लातूर : पशुधनाच्या अंगावर लालसर फोड, ताप येणे, चारा न खाणे असे प्रकार लातूर तालुक्यातील टाकळगाव येथे पशुधनात आढळून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी एका दहा महिन्यांच्या गोऱ्ह्याचा लम्पी स्कीन या आजारामुळे मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी गावातीलच आणखी एका दीडवर्षाच्या गायीला लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता गावातील पशुपालक धास्तावले आहेत.
वर्षभरापूर्वी जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव अनेक पशुधनांत आढळून आल्याने पशुपालकांची तारांबळ उडाली होती. काही महिन्यांपूर्वी सर्व काही सुरळीत असताना अचानक लातूर तालुक्यातील मांजरा पट्टा म्हणून ओळख असलेल्या टाकळगाव शिवारात दोन पशुधनाला लम्पीची लागण झाली आहे. टाकळगाव येथील मुकेश बाबूराव शिंदे यांच्या दहा महिन्यांच्या गोऱ्ह्याचे गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. तत्पूर्वी पाच दिवसांपूर्वी त्याला लम्पीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. तांदुळजा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारही सुरू केले होते. उपचार सुरू असतानाच त्या गोऱ्ह्याचा मृत्यू झाल्याचे शेतकरी शिंदे यांनी सांगितले. पाच दिवसांपासून उपचार सुरू होते, त्यात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप मुकेश शिंदे यांनी केला आहे.
शेतकरी धनंजय रामलिंग शिंदे यांच्या दीड वर्षाच्या गायीलाही लम्पीची लागण झाली असून अंगावर लालसर फोड आले आहेत. शिवाय, ताप येणे, गाय चाराही खात नसल्याने धनंजय शिंदे यांनी सांगितले. माझ्याकडे इतरही पशुधन आहे, त्यामुळे भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
मी राजीनामा दिला, मला माहिती नाही...
यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी तांदुळजा येथील पशुवैद्यकीय अधिकारी संतोष पाटोळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मुकेश शिंदे यांच्या पशुधनाला लम्पीची लागण झाली होती. यातच त्याचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पाटोळे म्हणाले, आता किती पशुधनाला लागण झाली मला माहिती नाही. मी आता राजीनामा दिला आहे. यासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी राजकुमार पडिले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
गावातील पशुधनाची तपासणी करा...
लम्पी स्कीनच्या भीतीने टाकळगाव परिसरातील गावातील शेतकरी धास्तावले आहेत. टाकळगावात असलेल्या पशुधनाची तपासणी करून लसीकरण करण्यात यावे. लम्पीचा फैलाव हाेणार नाही, यासाठी पशुवैद्यकीय विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी माजी उपसरपंच विनोद कदम, अमोल कदम, धनंजय शिंदे यांनी केली आहे.