लातूर - सध्याच्या कळात प्रेम करणं म्हणजेच विद्रोह होय. आजचं वातावरण पाहिलं असता, भांडणं करायची गरजच नाही, कारण आपल्या आजुबाजूला सगळं तेच आहे. आरे ला कारे म्हणायला धाडस लागत नाही. प्रेम करायला, आरे म्हणणाऱ्यांसमोर नम्रता दाखवायला हिंमत लागते, असे म्हणत सैराट फेम दिग्दर्शक नागरा मंजुळे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विद्रोही या शब्दाची त्यांच्या नजरेतून बदलेली वाख्या मांडली. तसेच, झोपलेल्या समाजाला जागं करण्याचं काम साहित्य संमेलनातून होतं, असेही ते म्हणाले.
उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या स्वरसम्राज्ञी लता मंगशेकर नगरीत भरलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर, अनेक दिग्गजांनी या साहित्य संमेलनात उपस्थिती लावली. नागराज मंजुळे यांनीही साहित्य संमेलनात येऊन कविता, साहित्य, चित्रपट आणि समाज या विषयावर परखड भाष्य केलं.
आम्ही लहान असताना गावात झोपलेल्या लोकांना जागं करायला, जागता पहारा द्यायला गुरखा येत होती. म्हणजे आपल्या घरात चोरी होऊ नये, दरोडा पडू नये म्हणून झापलेल्या लोकांना जागं ठेवण्यात हे गुरखा महत्त्वाची भूमिका पार पाडत होती. आता, समाजात झोपलेल्या लोकांना जागं करण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. मात्र, विचारवंत असतानाही लोकं झोपलेली आहेत, म्हणजे काहीतरी गंडलंय, असे म्हणत नागराज मंजुळे यांनी झोपलेल्या लोकांना जागं करायला पाहिजे, असे मत मांडले.
मला वाटतं की, साहित्यिक, कलाकार आणि यांच्या कलेतील दरी कमी व्हायला पाहिजे. कारण, साहित्यिक हेही कलाकारच असतात. म्हणूनच, साहित्यिक आणि कलाकार यांच्यातील अंतर कमी करणारं हे साहित्य संमेलन आहे. कलात्मक पातळीवर माझं साहित्य, कविता, कला किती यशस्वी ठरते यात मला घेणंदेणं नाही. आपली कला, साहित्य, चित्रपट हे माणसाच्या आयुष्यात उतरतं की नाही, हे पाहणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. साहित्य संमेलनातून सर्वसामान्यांचा विचार व्हायला हवा, त्यांच्या जगण्यातील गोष्टींचा विचार व्हावा. ते जर माणसांच्या उपयोगाला आलं नाही, जगण्याला आलं नाही, तर ते किती थोरं होतं याचं मला काहीही घेणंदेणं वाटत नाही, अशा शब्दात नागराज मंजुळेंनी साहित्य संमेलनाच्या मंचावरुन साहित्य आणि संमेलनावर परखड भाष्य केलं.