लातूर : वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेतही लातूरने दबदबा कायम ठेवला असून ६०० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयातील २०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहाशेवर गुण मिळविले आहेत. एम्ससारख्या देशपातळीवरील संस्थांमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचाही टक्का वाढणार आहे. राज्यातून २ लाख ७३ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ३१ हजार ८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
राज्याची सरासरी पाहिली तर ५० टक्क्यापेक्षा अधिक विद्यार्थी पात्र ठरत नाहीत. त्या तुलनेत लातूरमधून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि विशेषत: ६०० वर गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. राजर्षी शाहू महाविद्यालयातून निकाल प्राप्त झालेल्या १ हजार ३८८ विद्यार्थ्यापैकी ११८ विद्यार्थ्यांना ६०० वर गुण आहेत तर ५५० पेक्षा अधिक गुण मिळविणारे २५४ विद्यार्थी आहेत. त्यात ७०० गुण मिळवून आदित्य शेटकार महाविद्यालयात प्रथम आला आहे. रिलायन्स त्रिपुराचे २० विद्यार्थी ६०० वर तर ३८ विद्यार्थी ५५० पेक्षा अधिक गुण घेऊन यशवंत ठरले आहेत. दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे ६ विद्यार्थी सहाशेवर तर १४ विद्यार्थ्यांनी ५५० पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. चंद्रभानू महाविद्यालयाचे ३, कै.प्रयागबाई पाटील महाविद्यालयाचे २ तर महात्मा बसवेश्वर महाविद्यालय व राजमाता जिजामाता महाविद्यालयाचे प्रत्येकी १ विद्यार्थी ६०० गुणांच्या पुढे आहेत.