ना चारा ना पाणी; दुष्काळ कळांनी जीव कासावीस...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 10:47 PM2019-05-11T22:47:51+5:302019-05-11T22:48:15+5:30
गेल्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात ६४ टक्के तर उस्मानाबादमध्ये ५७ टक्के पाऊस झाला होता.
गेल्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात ६४ टक्के तर उस्मानाबादमध्ये ५७ टक्के पाऊस झाला होता. अपवाद वगळता सातत्याने उद्भवणारी दुष्काळाची स्थिती शेतकऱ्यांसह ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडणारी आहे. पशुधनांची संख्या आणि उपलब्ध चारा, कोरडेठाक झालेले प्रकल्प यामुळे मराठवाड्यात ना चारा न पाणी अशी स्थिती असून दुष्काळाच्या कळांनी जीवांची कासावीस होत आहे. सर्वाधिक फटका पशुधनाला बसत आहे. अधिग्रहणाने, टँकरने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत असला तरी मुक्या जीवांचे हाल बघवत नाहीत.
लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात सुमारे १७ दलघमी मृत जलसाठा आहे. त्यामुळे आठ दिवसांनी होणारा पाणी पुरवठा आता १२ दिवसांवर पोहोचला आहे. नक्कीच त्याची झळ शहरातील नागरिकांना बसत आहे. परंतु, शहराच्या बहुतांश भागात सार्वजनिक बोअर अद्यापि सुरू आहेत. त्यामुळे काहीअंशी पाण्याचा प्रश्न मार्गी लागला़ शिवाय ज्यांची ऐपत आहे ते टँकर मागवून दुष्काळाच्या झळांपासून तूर्त तरी दूर आहेत. झोपडपट्टी आणि वाढीव वसाहतींमध्ये मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. तुलनेने शहरी भागात पर्यायी सोयी आहेत. मात्र ज्या गावात नळ योजना बंद पडली, भूजल पातळी खोलवर गेली तिथे घागरभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालण्याची स्थिती आहे.
औसा तालुक्यात अशाच एका अरूंद विहिरीमध्ये उतरलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला होता़. अनेक गावातील खोलच खोल असलेल्या विहिरींमधून घागरभर पाणी आणण्यासाठी महिला स्वत:चा जीव धोक्यात घालतात. लातूर जिल्ह्यामध्ये साकोळ, घरणी, रेणा, तावरजा, व्हटी, मसलगा, देवर्जन, तिरू या प्रकल्पांपैकी साकोळ, घरणी आणि मसलगा या तीनच प्रकल्पात पाणी आहे़ अन्य प्रकल्प मात्र कोरडेठाक आहेत़ जिल्ह्यातील १३२ लघु प्रकल्पांनी दोन महिन्यांपूर्वीच तळ गाठला आहे़ उस्मानाबाद जिल्ह्यातसुद्धा सव्वाचारशे गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे़ सव्वाशे टँकर सुरू आहेत़ सातशेवर विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातले ७५ टक्के प्रकल्प कोरडे आहेत़ जो काही पाणीसाठा शिल्लक आहे त्यावर लाखो माणसे आणि पशुधनाची तहान कशी भागवायची, हा मोठा प्रश्न आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक टंचाईच्या झळा बसलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात विदारक स्थिती आहे़ पाण्याअभावी ऊस शेती उद्ध्वस्त झाली आहे़ जिल्ह्यातील ४९ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती़ त्यातील जवळपास २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस शेतकºयांनी मोडून काढला आहे़ लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये साखर कारखानदारीचा ऊस उत्पादक शेतकºयांना मोठा दिलासा आहे़ परंतु या वर्षीच्या भीषण दुष्काळाने सर्वात पहिल्यांदा ऊस क्षेत्र घटणार आहे़ उस्मानाबाद जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये ५० टक्केसुद्धा पाऊस झाला नव्हता़ त्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी नाही़ ३०-३५ किमीवरून पाण्याचे टँकर आणावे लागत आहे़
लातूर जिल्ह्यातही ३४५ गावांना टंचाईचा सामना करावा लागत असून, ५८ टँकर सुरू आहेत़ एकीकडे प्रस्तावाला होणारी दिरंगाई तर दुसरीकडे मंजूर झालेल्या टँकरच्या होणाºया फेºया किती? हा चर्चेचा विषय आहे़ अजून महिनाभर दुष्काळाचा सामना करावा लागणार असून, प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असणार आहे़ त्यातही वाडी-तांड्यावरील लोकांना घागरभर पाण्यासाठी दररोजचा संघर्ष आहे़ उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या १० वर्षातील सर्वात खडतर दुष्काळ यंदाचा आहे़