लातूर : सोशल मीडियातून दोन समाजात तेढ निर्माण होईल असा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी लातुरात एका ट्विटर युजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी म्हटले आहे, की सध्या सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होत आहेत. सुरू असलेल्या विविध वादाच्या अनुषंगाने, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार, लातूर पोलीस दलाचे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल कारवाई करत आहे. लातूर पोलीस ट्विटर हँडलवर एका ट्विटर युजरने कुठलातरी, आक्षेपार्ह आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा व्हिडिओ लातूर पोलिसांना टॅग करून व्हायरल केल्याचे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलच्या पोलिसांना आढळून आले. याबाबत व्हिडिओतील घटनेबाबतची माहिती घेतली असता, ही घटना लातूर जिल्ह्यामध्ये घडली नसल्याचे निष्पन्न झाले. तर ट्विटर युजरने सामाजिक शांतता भंग करून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
याप्रकरणी सोशल मीडिया मॉनिटर सेलमधील पोलीस अमलदार रियाज सौदागर यांच्या फिर्यादीवरून संबंधित ट्विटर यूजरविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरनं. २०२/२०२२ कलम ५०५ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे करीत आहेत.
सायबरची करडी नजर...कोणीही सोशल मीडियातून एखाद्याची बदनामी होईल, असे मेसेज व्हायरल करू नये. धार्मिक तेढ त्याचबरोबर जातीय तेढ निर्माण होईल अशी, व्यक्तिगत किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड करू नये. सोशल मीडियातील प्रत्येक हालचालींवर लातूर पोलिसांच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलची करडी नजर आहे.- निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक