शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बांधकामासाठी शासनाकडून एक कोटी मंजूर झाले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या शेजारी चार गुंठ्यांत दुय्यम निबंधक कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम होणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शिरूर अनंतपाळ येथे १२ वर्षांपूर्वी दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर झाले. परंतु, कार्यालयास स्वतः ची इमारत नसल्यामुळे अद्याप भाड्याच्या इमारतीत कार्यालय सुरू आहे. दरम्यान, शासनाकडून दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बांधकामासाठी एक कोटी मंजूर करून जवळपास वर्ष उलटत आहे. तरीही विविध तांत्रिक बाबींमुळे कार्यालयाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास मुहूर्त सापडला नाही. आता दुय्यम निबंधक कार्यालयाचे बांधकाम लवकर पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रकास मंजुरी दिली आहे. तांत्रिक बाबी पूर्ण होताच दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे.
एक तपानंतर मंजुरी...
शिरूर अनंतपाळ तालुक्याची निर्मिती होऊन २१ वर्ष उलटले आहे. सुरुवातीचे पाच वर्ष दुय्यम निबंधकांचे भेट कार्यालय होते. म्हणजे आठवडी बाजारच्या दिवशी एक दिवस कामकाज केले जात होते. प्रत्यक्षात सन २००८ साली कार्यालयाची स्थापना झाली. एक तप उलटल्यानंतर इमारतीसाठी मंजुरी मिळाली आहे. या कार्यालयाच्या बांधकामासाठी एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तांत्रिक बाबी पूर्ण होताच निधीची उपलब्धतेनुसार लवकरच कामास सुरू होईल, असे येथील उपविभागीय अभियंता आर. एन. पवार यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागास निधी प्रत्यक्षात उपलब्धता होताच तहसील कार्यालयाच्या शेजारी चार गुंठ्यांत इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे अभियंता पवार, दुय्यम निबंधक सुलोचना गोजमगुंडे यांनी सांगितले.