बोधे नगर परिसरात क्षयरोग तपासणी
लातूर : शहरातील बोधे नगर परिसरात मनपा आणि आरोग्य विभागाच्या वतीने क्षयरोग, कुष्ठरोग तपासणी मोहीम राबविली जात आहे. यासाठी विविध सामाजिक संस्थांची मदत घेतली जात आहे. जिल्ह्यात शोध मोहिमेसाठी १ हजार ८५६ पथके नियुक्त करण्यात आले असून, टीममध्ये एक पुरुष, महिला स्वयंसेवकांचा समावेश आहे. आतापर्यंत १ लाख ६९ हजार घरांतील ७ लाख ८७ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली असल्याचे जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
विहिरीचे पाणी भरण्यावरून मारहाण
लातूर : विहिरीचे पाणी भरण्याच्या कारणावरून एका जणास चावा घेऊन धक्काबुक्की करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना जळकोट तालुक्यातील खंबाळवाडी शिवारातील शेतात मंगळवारी घडली. या प्रकरणी फिर्यादी गोविंद रामराव देवकते (रा. खंबाळवाडी) यांच्या तक्रारीवरून नारायण माधवराव देवकते यांच्याविरुद्ध जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाॅ. चिमनदरे करीत आहेत.
लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये कार्यक्रम
लातूर : शहरातील श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था संचलित राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त लक्ष्मीरमण लाहोटी, अध्यक्ष शैलेश लाहोटी, राजेंद्र मालपाणी, ॲड. आशिष बाजपाई, आनंद लाहोटी, ईश्वरप्रसाद डागा, हुकुमचंद कलंत्री, कमलकिशोर अग्रवाल, सूर्यप्रकाश धूत, संजय भराडिया, प्राचार्य कर्नल एस.ए. वर्धन, आशिष अग्रवाल, रविंद्र व्होरा यांची उपस्थिती होती.
बेशिस्त वाहनांवर कारवाई मोहीम
लातूर : शहरातील विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला दुचाकी वाहने पार्किंग केली जात असल्याचे चित्र आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी मनपा आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई मोहीम राबविली जात आहे. मनपाच्या पथकाद्वारे बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागण्यास मदत होत आहे. गांधी चौक, पाच नंबर चौक, दयानंद गेट परिसर, औसा रोड, अंबाजोगाई रोड, गंजगोलाई आदी परिसरात मनपा आणि पोलिसांच्या वतीने संयुक्तपणे मोहीम राबविली जात आहे.