जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियोजन करण्यात आले आहे. निवडणूक निकालानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्रित येतील. त्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिऱ्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीलाच यश मिळेल.
- श्रीशैल उटगे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून ज्या-ज्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लढत देण्याचा प्रयत्न केला. हे प्रयत्न यशस्वी झाले. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त ग्रामपंचायतींत हा प्रयत्न केला आहे. साधारणपणे सर्वाधिक जागांवर महाविकास आघाडीचा विजय होईल. यासंदर्भातील खरे चित्र निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
- आ. बाबासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. सरकार चांगले काम करीत आहे. गावस्तरावरही महाविकास आघाडीचा प्रभाव दिसून येत आहे. अनेक गावांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित येऊन महाविकास आघाडीला सर्वाधिक यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील.
- संतोष सोमवंशी, जिल्हाध्यक्ष, शिवसेना
३८३ ग्रां.प.साठी मतदान...
निवडणूक विभागाच्या वतीने ४०८ ग्रामपंचायतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र, २५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ३८३ ग्रा.पं.साठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. जवळपास सहा लाख ७२ हजार मतदार आपला हक्क बजावणार आहेत. १ हजार ४५९ मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.
निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष...
राज्यात महाविकास आघाडीच्या वतीने विधान परिषद निवडणुका एकत्रितपणे लढविण्यात आल्या. त्यामध्ये बहूतांश प्रमाणात यश आले. तोच फॉर्म्युला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राबविला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना पक्षांचे उमेदवार वेगवेगळ्या पॅनेलकडून लढत असले तरी निकालानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.