उदगीर आगाराचे नियाेजन काेलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:16 AM2021-01-14T04:16:47+5:302021-01-14T04:16:47+5:30
देवर्जन-हत्तीबेट मार्गावरून उदगीर आगाराच्या लातूर, करवंदी, गंगापूर, साकोळ, वलांडी या गावाला जाणाऱ्या दिवसातून १६ बसफेऱ्या नियमित सुरु करण्यात ...
देवर्जन-हत्तीबेट मार्गावरून उदगीर आगाराच्या लातूर, करवंदी, गंगापूर, साकोळ, वलांडी या गावाला जाणाऱ्या दिवसातून १६ बसफेऱ्या नियमित सुरु करण्यात आल्या हाेत्या. दरम्यान, कोरोनामुळे मुंबईतील लोकल रेल्वे बंद असल्याने राज्य परिवहन महामंडळाने आपल्या आगारातील चालक-वाहक आणि बस पाठवून मुंबईतील प्रवाशांची सोय केली. हे करत असताना ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता स्थानिक आगार प्रमुखांनी घेण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिलेल्या आहेत. असे असताना चालक-वाहक आणि बस नसल्याचे कारण पुढे करत या आगाराने देवर्जन-हत्तीबेट मार्गावर धावणाऱ्या सर्व बस बंद केल्या आहेत. देवर्जन-हत्तीबेट मार्गावर हत्तीबेट हे ‘ब’ वर्गाचे पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळाला दररोज ६०० ते ७०० पर्यटक भेट देतात. शिवाय, हा मार्ग देवणी, शिरूर अनंतपाळ, निलंगा तालुक्यासह लातूर जिल्ह्याला जोडणारा आहे. मार्गावरून धावणाऱ्या सर्व बस उदगीर आगाराने बंद केल्या आहेत.
ग्रामीण प्रवाशांची गैरसोय थांबवा...
ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय करत मुंबईच्या प्रवाशांची सोय नको. मुंबईच्या प्रवाशांना दुचाकी, चारचाकी आणि टॅक्सीचा आधार आहे; मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांना महामंडळाच्या बसशिवाय दुसरा पर्यायच नाही. परिणामी, येथील प्रवाशांची हाेणारी गैरसाेय तातडीने थांबवावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रप्रकाश खटके, सरपंच सुनीता खटके यांनी केली आहे.