लातूर शहर आणि जिल्ह्यातील एकूण २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकीनंतर घरफोडीचा आकडा मोठा आहे. लाॅकडाऊननंतर चोरटे सक्रिय झाले अन् घरफोडीच्या घटना वाढल्या. सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण कोट्यवधींचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला आहे. याबाबत त्या-त्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. मात्र चोरटे काही पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
मालमत्ताधारकांनी आपले दुकान, घर, हाॅटेल आणि इतर मालमत्तेसाठी कुलूप खरेदी करताना मात्र मोठ्या प्रमाणात काटकसर केल्याचे दिसून येत आहे. शंभर ते दीडशे रुपयांच्या आतले कुलूप बहुतांश नागरिकांनी खरेदी केल्याचे दिसून येते. दणकट आणि महागड्या कुलुपांना फारशी मागणी नाही. स्वस्त आणि कमी दणकट असलेल्या कुलुपांना सर्वाधिक मागणी आहे. डेडबोल्ट, कॅप लाॅक्स, मोर्टीज लाॅकला १० ते १५ टक्के मालमत्ताधारकांची मागणी आहे. तकलादू कुलूप असेल तर चोरट्यांना घर फोडण्यासाठी अधिक सोयीचे ठरते. काही घटनांमध्ये दणकट कुलूप असल्याने त्यांना ते तोडता आले नाही म्हणून चोरीचा प्रयत्न फसला.
चोरटे ठराविक पद्धतीने घरफोड्या, चोरी करतात. कमी वेळेत दार आणि कडीकोंडी तोडता यावे, अशा पद्धतीच्या घरांची प्रारंभी टेहळणी केली जाते आणि त्यानंतर ते घर फोडण्याचे धाडस चोरटे करतात. सुरक्षेच्या दृष्टीने मालमत्ताधारक फारसा विचार करीत नसल्याचे दिसते.