देवणी : तालुक्यात एकूण १६ तलाठी सज्जे असून त्याअंतर्गत ५४ महसुली गावे आहेत. मात्र, तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद केवळ तीन केंद्रांवरच घेतली जात आहे. परिणामी, अनेकदा अचूक नोंद होत नसल्याने सज्जानिहाय पर्जन्यमापक बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
देवणी तालुक्यात तीन महसूल मंडळे असून १६ तलाठी सज्जाअंतर्गत ५४ महसुली गावे आहेत. देवणी, वलांडी व बोरोळ अशी तीन महसूल मंडळे आहेत. तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद ही या तीन महसूल मंडळांतील पर्जन्यमापकावर घेतली जाते. या तीन ठिकाणच्या नोंदींवरून संपूर्ण तालुक्यातील ५४ गावांतील पावसाची सरासरी गृहित धरली जाते.
या आकडेवारीनुसार शासनाच्या योजनांचा लाभ दिला जातो अथवा नियोजन ठरविले जाते.
गेल्या काही वर्षांपासून पाऊस लहरी स्वरूपाचा हाेत आहे. कधी गावात कमी पाऊस असतो तर त्याच गावच्या शिवारात अधिक पाऊस असतो. याशिवाय, काहीवेळा गावात अधिक पाऊस असतो परंतु, शेतात पावसाचा थेंबही नसतो. एका शिवारात पाऊस होतो, तर दुसऱ्या शिवारात पाऊस नसतो, अशी नैसर्गिक परिस्थिती आहे.
गावात झालेल्या पावसाचे अचूक मूल्यमापन होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा फटका बसत आहे. विशेषत: पीकविम्याच्या आर्थिक मदतीपासून शेतकऱ्यांना वंचित रहावे लागत आहे.
त्यामुळे तालुक्यात गावनिहाय अथवा किमान तलाठी सज्जानिहाय १६ ठिकाणी पर्जन्यमापक बसविण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.