मुलाच्या शिक्षणासाठी पैसे देण्यास नकार; माजी कर्मचाऱ्याने डॉक्टरचे डोके फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 03:56 PM2020-08-20T15:56:58+5:302020-08-20T15:58:35+5:30
पैसे नाही दिल्यास बघून घेतो म्हणून जिवे मारण्याची धमकीही दिली.
लातूर : मुलाच्या शिक्षणासाठी ५० हजार रुपयांची मागणी करीत खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्याने रुमालात दगड बांधून डॉक्टरचे डोके फोडले. ही घटना बुधवारी दुपारी घडली.
डॉ. रमेश तुकाराम भराटे यांचे बार्शी रोडवर गायत्री रुग्णालय आहे. त्यांच्याकडे आरोपी लक्ष्मण मव्हाळे पूर्वी काम करीत होता. या प्रकरणी आरोपी लक्ष्मण मव्हाळेविरुद्ध कलम ३२५, ३२४, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, सहायक पोलीस निरीक्षक जगताप करीत आहेत.
पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी
आरोपी लक्ष्मण मव्हाळे व अन्य एक जण बुधवारी डॉ. रमेश भराटे यांच्याकडे आले. त्यावेळी आरोपीने माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी ५० हजार रुपये द्या, अशी मागणी केली. त्यावेळी डॉ. भराटे यांनी आता तुम्ही माझ्याकडे कामावर नाहीत, त्यामुळे मी तुम्हाला एवढी मोठी रक्कम देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. हे ऐकून आरोपीने तुम्ही मला पैसे कसे देत नाहीत म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर रुमालात दगड बांधून तो फिरवून डोक्यात घातला. रूमालातून दगड पडल्यानंतर परत तो घेऊन उजव्या हातावर आणि मनगटावर मारला. तसेच पैसे नाही दिल्यास बघून घेतो म्हणून जिवे मारण्याची धमकीही दिली.