आधार कार्डअभावी ८ हजार विद्यार्थ्यांची ‘सरल’वर नोंदणी रखडली!
By संदीप शिंदे | Published: March 3, 2023 05:16 PM2023-03-03T17:16:42+5:302023-03-03T17:17:42+5:30
‘सरल’वर विद्यार्थ्यांचे माहिती भरण्याचे ९८.४१ टक्के काम पूर्ण
लातूर : शासनाकडून शालेय पोषण आहार, सरल पोर्टलसह विविध योजनांसाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल पोर्टलवर अपलोड करण्याच्या सुचना आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ९८.४१ टक्के काम पुर्ण झाले आहे. मात्र, आधार कार्ड उपलब्ध नसल्याने ८ हजार १६८ विद्यार्थ्यांची सरल पोर्टलवरील नोंदणी रखडली आहे.
जिल्ह्यात २७५० शाळा असून, ५ लाख १५ हजार २५ विद्यार्थी संख्या आहे. दरम्यान, आतापर्यंत ५ लाख ६ हजार ८५७ विद्यार्थ्यांची आधार कार्डविषयक माहिती सरल पोर्टवर भरण्यात आली आहे. तर ८ हजार १६८ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड शाळास्तरावर जमा झालेले नाही. दरम्यान, शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून केंद्रस्तरावर आधार संच देण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसारही या कामाला गती मिळाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अहमदपूर तालुक्याचे ९९ टक्के, औसा ९९, चाकूर ९७, देवणी ९८, जळकोट ९७, लातूर ९८, लातूर युआरसी१ - ९८, लातूर युआरसी २ - ९८, निलंगा ९८, रेणापूर ९८, शिरुर अनंतपाळ ९९ आणि उदगीर तालुक्याचे ९८.११ टक्के काम पुर्ण झाले आहे. दरम्यान, या नोंदणीमध्ये २ हजार ८६५ विद्यार्थ्यांची नावे दुबार आढळली आहेत. तर १ लाख ४ हजार १०४ आधार कार्डमध्ये त्रुटी दाखविल्यानू मुलांना पुन्हा आधार कार्ड दुरुस्ती करुन घ्यावी लागली आहे.
जिल्ह्यात ५ लाख १५ हजार विद्यार्थी...
जिल्ह्यात ५ लाख १५ हजार २५ विद्यार्थी संख्या असून, ५ लाख ६ हजार विद्यार्थ्यांनी शाळांकडे आधार जमा केले आहे. तर ८१६८ जणांनी आधार जमा केलेले नाही. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील ४९६, औसा ४३०, चाकूर ७३०, देवणी ३०४, जळकोट ४४८, लातूर ११४७, लातूर युआरसी १- ८४४, लातूर युआरसी २- १०६९, निलंगा १०५८, रेणापूर २१५, शिरुर अनंतपाळ ५४ तर उदगीर तालुक्यातील १३८६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
पूर्ण नोंदणी करण्यासाठी प्रयत्न...
सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात येत आहे. त्यासाठी आधार कार्डची माहीतीही भरण्यात येत आहे. जिल्ह्यात ९८.४१ टक्के काम पुर्ण झाले असून, ज्या तालुक्यांमधील विद्यार्थ्यांची नोंदणी राहीली आहे किंवा आधार कार्ड काढलेले नाही, त्यांनी तातडीने आधार कार्ड शाळेकडे जमा करण्याच्या सुचना शिक्षण विभागाकडून शाळांना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १०० टक्के नोंदणी होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.