मखबरे-नवाबन, खतीब मस्जिद येथे जलपुर्नभरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:14 AM2021-07-02T04:14:33+5:302021-07-02T04:14:33+5:30
उदगीर : पावसाचे पाणी घराच्या, इमारत छतावरून एका मोठ्या जमिनीतील खड्ड्यात मुरवून त्याचे पुनर्भरण करणे म्हणजेच जलपुनर्भरण होय. कारवाँ ...
उदगीर : पावसाचे पाणी घराच्या, इमारत छतावरून एका मोठ्या जमिनीतील खड्ड्यात मुरवून त्याचे पुनर्भरण करणे म्हणजेच जलपुनर्भरण होय. कारवाँ फाउंडेशनचे काही तरुण व पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या पुढाकारातून सध्या या चळवळीने शहरात बाळसे धरले आहे. मागील आठवड्यात मराठवाड्यातील सर्वांत मोठी असलेली येथील जय जवान चौकातील मखबरे-नवाबन व खतीबान मस्जिद येथे जलपुनर्भरण करण्यात आले आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, पाणी सातत्याने जमिनीत मुरते. ते भूपृष्ठाखालील जलसाठ्यात जमा होत होते. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढत असते. त्यालाच आपण नैसर्गिक पुनर्भरण म्हणू. वर्षभर होणाऱ्या पाण्याच्या उपशामुळे ही पातळी खालावत जाते, पण आपण जर जलपुनर्भरणासाठी पुढाकार घेतला तर पाणी पातळी पूर्वस्थितीवर आणू शकतो. ही बाब येथील सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कारवाँ फाउंडेशनच्या लक्षात आली. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून या टीमने जलपुनर्भरणावर भर दिला आहे, त्यास यशही आले आहे.
मागील आठवड्यात येथील मराठवाड्यातील सर्वांत मोठी असलेली मखबरे-नवाबन व खतीबान मस्जिद येथील छतावरील पावसाचे पाणी एकत्र करून जमिनीत मुरवण्यासाठी मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या पुढाकारातून प्रयत्न केले. या उपक्रमाचे कौतुक करीत येथील प्रमुख मौलाना हबीबू रहमन यांनी परवानगी दिली. या मस्जिदीचे छत ११३ बाय ११३ आहे. एकूण १२,७६९ स्क्वेअर फूट छतावरील पावसाचे पाणी एकत्र करून जमिनीखालील खड्ड्यात मुरविले आहे. सदरील दोन्ही मस्जिदीमध्ये जलपुनर्भरण करण्यासाठी मुख्याधिकारी भरत राठोड, कारवाँच्या अदिती पाटील, ओमकार गांजुरे, तेजस अंबेसंगे, शकीब सोफी, गुरुप्रसाद पांढरे, पाशा मिर्झा, ॲड. खतीब, जशन डोळे, शिवानंद सूर्यवंशी, मोबीन शेख, आशिष धानुरे, शुभम पाटील यांनी पुढाकार घेतला.
पाणी वर्षभर उपलब्ध होते...
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाळी पाण्याचा संचय होय. ही अत्यंत सोयीची आणि प्राचीन पद्धत आहे. यात आपल्या भागात पडणारे पावसाचे पाणी आपल्या बोअरवेल, विहीर आणि शोष खड्ड्यामध्ये जिरवणे होय. त्यामुळे आपली जुनी बोअरवेल असेल तर त्याला चांगलं पाणी लागते आणि ते पाणी वर्षभर टिकून राहते, अशी माहिती मुख्याधिकारी भारत राठोड यांनी दिली.
फाउंडेशनकडून माहिती, मार्गदर्शन...
पावसाळ्यात घराच्या छतावर साठणारे पावसाचे पाणी छताच्या उताराच्या बाजूने पाईप लावून खाली घ्यायचे. पाईपद्वारे हे पाणी विहिरीजवळच्या शोषखड्ड्यात सोडून द्यायचे. या पाईपला फिल्टर लावणे आवश्यक असते. आपण राहत असलेल्या जागेत ५ फूट लांब, ५ फूट रुंद आणि साधारण चार-साडेचार फूट खोल खड्डा घ्यावा. हा खड्डा दीड फूट उंचीपर्यंत दगड-गोट्यांनी भरावा. त्यावर दीड फूट उंच विटांच्या तुकड्यांचा थर द्यावा. विटांच्या तुकड्यांवर दीड फूट वाळू टाकून खड्डा भरून घ्यावा. छतावर पडणारे पाणी या खड्ड्यात सोडून द्यावे. जलपुनर्भरण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे काळाची गरज आहे. त्यासाठी माहिती देण्यासाठी आमची कारवाँ टीम तयार आहे, असे अदिती पाटील यांनी सांगितले.