तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या सातबारामध्ये किरकोळ त्रुटी आहेत. तसेच फेरफारची प्रकरणे आहेत. ती सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास होत असल्याचे पाहून आणि ऑनलाइन कामात येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलेल्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी तालुक्यातील ३५ सज्जांचे तलाठी, दोन मंडळ अधिकारी आणि नायब तहसीलदारांचे महसूल फेरफारसंदर्भात शिबिर घेतले. त्यामुळे सातबारामधील किरकोळ दुरुस्ती तसेच फेरफारची कामे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास विनाविलंब होणार आहेत.
दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी व गुरुवारी यासंदर्भातील समस्या निकाली काढल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी फेरफार, १५५ च्या संदर्भातील दुरुस्त्या करून घेण्याचे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरासाठी नायब तहसीलदार धनेश दंताळे, बबिता आळंदे आदींनी परिश्रम घेतले.
७५ प्रकरणे भूमिअभिलेखची...
सन २०२१ पासून ४५० प्रकरणे प्रलंबित होती. त्यातील ३०० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. १५० प्रकरणे शिल्लक होती. त्यापैकी ३६ प्रकरणे मंगळवारी जागेवरच सोडविण्यात आली. ७५ प्रकरणे भूमिअभिलेख कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहेत, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.