विहिरीत पडलेल्या महिलेचे विद्यार्थ्याने वाचविले प्राण (प्रादेशिक, सीडीसाठी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:00 AM2021-01-08T05:00:00+5:302021-01-08T05:00:00+5:30
निलंगा तालुक्यातील सावरी येथील संजय सावरीकर यांच्या शेतात ऊसतोडणीसाठी ऊसतोड कामगार मंगळवारी रात्री उशिरा दाखल झाले आहेत. बुधवारी सकाळी ...
निलंगा तालुक्यातील सावरी येथील संजय सावरीकर यांच्या शेतात ऊसतोडणीसाठी ऊसतोड कामगार मंगळवारी रात्री उशिरा दाखल झाले आहेत. बुधवारी सकाळी ऊसतोडी कामगारांच्या टोळीतील एक महिला आणि एक लहान मुलगी सावरीकर यांच्या शेतातील विहिरीतून पाणी आणण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, विहिरीतून घागरभर पाणी काढत असताना महिलेचा अचानक पाय घसरला आणि तोल गेल्याने ती विहिरीत पडून बुडू लागली. विहिरीवर थांबलेल्या मुलीने हे पाहून आरडाओरड करण्यास सुरुवात केली तर महिला जीव वाचविण्यासाठी धडपड करू लागली.
दरम्यान, सातारा येथील सैनिकी स्कूलचा माजी विद्यार्थी व पिंपरी चिंचवड येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेला अभिजित किशोर पाटील (२०) हा दूध आणण्यासाठी शेताकडे गेला होता. दूध काढून तो आणि त्याचा भाऊ कमलाकर पाटील हे चिंचा गोळा करीत होते. तेव्हा मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून अभिजित पाटील याने विहिरीकडे धाव घेऊन पाहिले. तेव्हा विहिरीत महिला बुडत असल्याचे दिसले. तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता कपड्यांसह विहिरीत उडी घेऊन बुडत असलेल्या सदरील महिलेस पाण्याबाहेर काढले. अभिजितने सदरील महिलेचे प्राण वाचविले.
धाडस, माणुसकीचे शिक्षण...
माझे शिक्षण साताऱ्याच्या सैनिकी स्कूलमध्ये झाले आहे. तिथे धाडस आणि माणुसकीचे शिक्षण मिळाले. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उडी मारून सदरील महिलेस पाण्याबाहेर काढले, असे अभिजित पाटील याने सांगितले.
पोलिसांनी केला सत्कार...
अभिजित पाटील याने बुडत असलेल्या महिलेचे प्राण वाचविल्याने त्याचा औराद शहाजानी पोलीस ठाण्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार, पोना. बब्रुवान तुडमे, पोकॉ. गोपाळ बरडे, विश्वनाथ डोंगरे, रवींद्र काळे, मल्लिकार्जुन लातुरे यांच्यासह पोलीस कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
फोटो नेम : ०६ एलएचपीऔराद शहाजानी टीफ
०६एलएचपी अभिजीत पाटील टीफ
फोटो कॅप्शन : औराद शहाजानी पोलीस ठाण्याच्या वतीने अभिजीत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार, पोना. बब्रुवान तुडमे, पोकॉ. गोपाळ बरडे, विश्वनाथ डोंगरे, रवींद्र काळे, मल्लिकार्जुन लातुरे.
अभिजीत पाटील पासपोर्ट फोटो