'पहिलं पाऊलं- एक बीज लावून' शाळांमध्ये अनोख्या उपक्रमाने होणार विद्यार्थ्यांचे स्वागत
By हरी मोकाशे | Published: June 14, 2023 03:57 PM2023-06-14T15:57:56+5:302023-06-14T16:05:56+5:30
स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान या मोहिमेस लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त व्हावे, लोकसहभागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही सहभाग राहण्यासाठी विशेष उपक्रम
लातूर : शासनाच्या हर घर नर्सरी मोहिमेस बळकटी देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने पहिलं पाऊलं- एक बीज लावून हा विशेष उपक्रम शाळेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यातील प्रत्येक गावांत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे बालकांच्या मनावर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व बिंबवण्यास मोठी मदत होणार आहे.
स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानअंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येते. दरम्यान, या मोहिमेस लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त व्हावे. लोकसहभागाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही सहभाग राहण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात पहिलं पाऊलं- एक बीज लावून हा विशेष उपक्रम गुरुवारी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शासनाच्या हर घर नर्सरीला बळकटी मिळणार आहे.
अनोख्या पध्दतीने हाेणार स्वागत...
जिल्ह्यातील सर्व गावांत शाळेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी दोन बिया व बिया रुजविण्याच्या पिशवीत माती टाकून देण्यात येऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्या पिशवीत बिया रुजविण्यापासून ते पुढील वर्षाच्या पावसाळ्यापर्यंत पूर्ण देखभाल त्या विद्यार्थ्याने करावयाची आहे. बी संगोपनापासून ते रोप तयार होईपर्यंतच्या संगोपनाबाबतची सर्व निरीक्षणे विद्यार्थ्यांनी विशेष नोंदवहीत नोंदवावी लागणार आहेत.
मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी वृक्ष लागवड...
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी बियांपासून तयार केलेल्या रोपांची लागवड १७ सप्टेंबर रोजी योग्य त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांवर राहणार आहे.
अडीच लाख रोपांची निर्मिती...
या उपक्रमातून जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांमार्फत अडीच लाख रोपांची निर्मिती होणार आहे. यासंदर्भात शाळा व ग्रामपंचायतींना सूचना करण्यात आल्या आहेत. बिया आणि पिशव्यांची जबाबदारी ग्रामपंचायती, नगर पंचायतींवर सोपविण्यात आली आहे.
वनक्षेत्र वाढीस हातभार...
पहिलं पाऊलं- एक बीज लावून या विशेष उपक्रमामुळे बालकांमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाविषयी जिव्हाळा निर्माण होईल. त्यामुळे बालकांना वृक्षांचे महत्त्वही समजेल. या मोहिमेतून जिल्ह्यातील वन क्षेत्र वाढीस हातभार लागणार आहे.
- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.